पुण्यात अपघाताचं सत्र सुरूच, आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू

| Updated on: Jun 23, 2024 | 10:29 AM

पुण्यात महिन्याभरापूर्वी घडलेल्या पोर्श अपघाताचे पडसाद अजून उमटतच आहेत. एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून दोघांना चिरडलं. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला.

पुण्यात अपघाताचं सत्र सुरूच, आमदाराच्या पुतण्याने दोघांना चिरडलं; एकाचा मृत्यू
Follow us on

पुण्यात महिन्याभरापूर्वी घडलेल्या पोर्श अपघाताचे पडसाद अजून उमटतच आहेत. एका अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवून दोघांना चिरडलं. या घटनेनंतर पुण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. धक्कादायक गोष्ट म्हणजे एका आमदाराच्या पुतण्याकडून हा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने दुचाकीला उडवलं. यामध्ये दुचाकीवरील एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर कळंब येथे झालेल्या अपघातात आमदारांच्या पुतण्यानं बेदरकारपणे दोघांना चिरडलं. मोहिते यांच्या पुतण्याच्या कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार खारी कोसळले. त्यापैकी ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहितेंचा पुतण्या पुण्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका टू-व्हीलरला त्याच्या कारची धडक बसली. अपघात अतिशय भीषण होता. त्यामध्ये दुचाकीचा चुराडा झाला, तर कारचे देखील मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमाराच हा अपघात झाला आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अपघातानंतर माझा पुतण्या हा कुठेही पळून गेला नाही. शिवाय त्याने मद्यपान ही केलं नव्हतं. असा दावा आमदार मोहितेंनी केलाय.