नवी दिल्ली | 25 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका व्यक्तीच्या मुलाचा मृत्यू स्कॉर्पिओ गाडीला झालेल्या अपघातात झाला.त्यावेळी गाडीची एअरबॅग उघडली नसल्याने आपल्या मुलाचे प्राण गेल्याचा आरोप करीत या व्यक्तीने महिंद्र एण्ड महिंद्र कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्र आणि त्यांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार राजेश यांनी आपल्या तक्रारी म्हटले आहे की त्यांनी आपल्या एकलुत्या एक मुलगा अपूर्व मिश्रा याला ही स्कॉर्पिओ गिफ्ट दिली होती.
14 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मुलगा अपूर्व आपल्या मित्रांसोबत लखनऊवरुन कानपूरला येत असताना धुक्यामुळे त्यांची गाडी डीव्हायडर धडकली. या अपघातात अपूर्व मिश्रा यांचा मृत्यू झाला. त्यांनी तिरुपती ऑटोमोबाईल येथून ही गाडी विकत घेतली होती. त्यांनी 29 जानेवारीला ही गाडी घेऊन शोरुममध्ये गेले. त्यांनी गाडीत दोष असल्याचे सांगितले. सीटबेल्ट लावूनही अपघातावेळी एअरबॅग उघडलीच नाही असे त्यांनी कार डीलरला समजावण्याचा प्रयत्न केला. जर गाडीची योग्य तपासणी करुन तिला विकली असती तर आपल्या मुलाचे प्राण वाचले असते.
कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राजेश यांचे म्हणणे ऐकून न घेता उलट त्यांना मारहाण करुन हाकलून लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेचा निषेध म्हणून त्यानंतर त्यांनी त्यांची गाडी महिंद्र कंपनीच्या शोरुम समोर उभी केली. राजेश मिश्रा यांनी शेवटी कोर्टात धाव घेत आनंद गोपाल महिंद्र यांच्यासह 13 जणांवर एफआयआर दाखल केली आहे.कानपूर पोलिसांनी या प्रकरणी कारची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.