कल्याण : कल्याण स्थानकात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सकाळी कामावर जात असलेल्या तरुणीची छेडछाड केल्याची घटना घडली. रेल्वे स्थानकावरील पुलावरुन चालत जात असताना एक माथेफिरुने तरुणीला मिठी मारली. तरुणीचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूच्या नागरिकांनी आरोपीला पकडून चांगलाच चोप दिला. कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे माथेफिरुला ताब्यात घेतले. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु आहे. रेल्वे स्टेशन परिसरात मद्यपी, गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. यामुळे तरुणी, महिलांची छेडछाड करण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशा घटनांना आळा घालण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांसमोर आहे.
पीडित तरुणी नेहमीप्रमाणे सकाळी 6.45 सुमारास कामावर चालली होती. पादचारी पुलावरुन चालत असताना यावेळी अचानक माथेफिरु तिच्याजवळ आला आणि त्याने तिला मिठी मारली. यामुळे घाबरलेली तरुणी ओरडू लागली. तरुणीचा आरडाओरडा ऐकून इतर प्रवाशांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. मात्र तरुणी खूप घाबरल्याने ती तिथून निघून गेली. यामुळे याबाबत तक्रार दाखल झाली नाही.
मात्र तेथे उपस्थित काही जागृक प्रवाशांनी रेल्वे प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे या सातत्याने रेल्वे पोलीस आणि आरपीएफला या घटनेची माहिती देत पाठपुरावा करत होत्या. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी चार पथकं नेमून सीसीटीव्हीच्या आधारे या माथेफिरूचा शोध सुरू केला. या माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. संतोष शर्मा असे माथेफिरूचं नाव आहे. प्रवाशांनी केलेल्या मारहाणीत आरोपी जखमी झाला असून, त्याच्यावर कल्याणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.