नवी दिल्ली : निक्की यादव हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठा खुलासा केला आहे. निक्कीच्या हत्येचा कट रचण्यात साहिल गेहलोतसह त्याचे कुटुंब आणि त्याचे मित्रही सहभागी असल्याचे चौकशीत उघडकीस आले आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने साहिलचे वडील वीरेंद्र सिंग, भाऊ आशिष आणि नवीन, मित्र लोकेश आणि अमर यांना अटक केली आहे. विरेंद्र सिंह यांच्याविरोधात कलम 120 (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहिल आणि निक्कीने ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केले होते. मात्र साहिलच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हते. पोलिसांनी निक्की आणि साहिलच्या लग्नाचे प्रमाणपत्रही जप्त केले आहे.
साहिलने निक्कीची हत्या केल्यानंतर त्याच्या मित्राने आणि चुलत भावाने मृतदेह फ्रिजमध्ये लपवायला त्याला मदत केली. साहिलने निक्कीच्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलिट केला. मोबाईलमध्ये दोघांमधील व्हॉट्सअप चॅट होते, ज्यामध्ये दोघांमध्ये भांडणे झाल्याचे पुरावे होते. पोलिसांसाठी हा मोठा पुरावा होता.
साहिल आणि निक्की यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये नोएडा येथील आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. मात्र या लग्नामुळे साहिलचे कुटुंबीय नाराज होते. त्यांनी डिसेंबर 2022 मध्ये साहिलचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळवले. साहिलच्या पहिल्या लग्नाची माहिती मुलीच्या कुटुंबीयांपासून लपवून ठेवण्यात आली होती.
आरोपी साहिलने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, 9 फेब्रुवारीच्या रात्री निक्की त्याच्यासोबत होती. त्याने 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 ते 9.30 च्या दरम्यान निगमबोध घाटाजवळील पार्किंगमध्ये तिची हत्या केली. निक्कीची हत्या केल्यानंतर आरोपीने तिचा फोन बंद करुन त्यातील सिम काढला आणि फोन आपल्याजवळ ठेवला.
आरोपी साहिलकडून निक्की यादवचा फोनही जप्त करण्यात आला आहे. क्राइम ब्रँचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा घटनाक्रम जाणून घेण्यासाठी साहिलला जेथे हत्या झाली त्या ठिकाणी काश्मिरी गेट येथेही नेले. तसेच हत्येच्या रात्री साहिल निक्कीला निजामुद्दीन आणि आनंद विहार रेल्वे स्थानकावर घेऊन गेला होता, तेथेही पोलीस त्याला गेऊन जाणार आहेत.