कोल्हापूर / भूषण पाटील : स्वतःला मूल नसल्याने चिमुकल्याचे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला 48 तासांच्या आत पोलिसांनी अटक केली आहे. बाळूमामा येथून अपहरण केलेल्या मुलाला कोल्हापूर पोलिसांनी 48 तासांत शोधून काढले. बालकाला पळवून नेणाऱ्या जोडप्याला काल रात्री अटक करण्यात आली आहे. बालकाचे अपहरण केल्यानंतर हे जोडपे त्याला घेऊन सोलापुरात गेले होते. पोलिसांनी सोलापुरातून बालकासह त्यांना अटक केली. मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असे अपहरण करणाऱ्या दाम्पत्याचे नाव आहे. दोघेही साताऱ्यातील मेढा येथील रहिवासी आहेत.
मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी मुलाचा शोध घेण्यासाठी सात वेगवेगळ्या तपास यंत्रणा राबवल्या. तब्बल 90 ते 95 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत मुलाचा शोध लावला. मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, आरोपींना अटक केली आहे.
सातारा जिल्ह्यातील रहिवासी सुषमा राहुल नाईकनवरे ही महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलासह कोल्हापुरातील आदमापूर येथे बाळूमामा मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी मंदिरातील हॉलमध्येच त्यांची राहण्याची व्यवस्था होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सुषमा ही अंघोळीसाठी गेली असता दर्शनासाठी आलेल्या आरोपी जोडप्याने तिच्या मुलाला पळवून नेले.
याप्रकरणी भुदरगड पोलीस मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरवात करत मंदिर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी सीसीटीव्हीत आरोपी जोडपे मुलाला घेऊन जात असताना कैद झाले. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेतला असता सदर जोडपे सोलापुरातील सांगोला तालुक्यातील जवळा येथे राहत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी जोडप्याला सोलापुरातून अटक केली. मुलाची सुटका करत त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. याबाबत पुढील तपास भुदरगड पोलीस करत आहेत.