कल्याण : ऑनलाईन औषधे खरेदी करुन ऑनलाईन पैसे पाठवल्याचा मॅसेज करत मेडिकल चालकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रोशन गुप्ता असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर आयुष्यमान मिश्रा असे त्याच्या फरार साथीदाराचे नाव आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.
कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात असलेल्या एका मेडिकल स्टोअर्समधून आयुष्यमान मिश्रा आणि रोशन गुप्ता या दोघांनी ऑनलाईन 51 हजार 700 रुपयांची औषधांची खरेदी केली होती. या औषधांचे बिल आयुष्यमान मिश्रा याच्या अकाउंटवरून पे केल्याचा मॅसेज रोशन गुप्ताने मेडिकल चालकाला पाठवला.
मात्र मेडिकल चालकाने अकाऊंट चेक केले असता प्रत्यक्षात पैसे अकाऊंटमध्ये आले नव्हते. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मेडिकल चालकाच्या लक्षात आले. मेडिकल चालकाने तात्काळ खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
मेडिकल चालकाच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दखल करत 24 तासाच्या आत फसवणूक करणाऱ्या आरोपींपैकी एकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याचा अन्य एक साथीदार असल्याची माहितीही दिली.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आयुष्यमान मिश्रा अद्याप फरार आहे. मिश्रा हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ, परिमंडळ 3 कल्याण सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरु आहे.