गोंदिया : एक आरोपी (Criminal) पोलीस स्टेशनमधून (Police Station) पळाल्याने पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली होती. मात्र या आरोपीला पुन्हा अटक केल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपण अनेकदा पोलिसांच्या तावडीतून आरोपी कुठलाही बनाव करून पळून गेल्याच्या घटना पाहिल्या आहे. या आरोपीनेही मोठा बनाव रचून पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या आणि पसार झाला होता. मात्र पोलिसांनी पुन्हा त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. दहा लाखाच्या खंडणीसाठी आमगाव तालुक्यातील बनगाव येथील एका 17 वर्षाच्या मुलाचा गळा आवळून खून करण्यात आला होता. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी अटक केलेला 24 वर्षीय आरोपी दुर्गाप्रसाद हरिणखेडे हा पोलीस कोठडीत होता. आज सकाळी 8 वाजेच्या दरम्यान पोलीस स्टेशन आवारातच असलेल्या शौचालयात शौचास गेला असता सोबत असलेल्या एकट्या पोलिसाला झटका देत भिंतीवरुन फरार झाला. त्यानंतर पसार झालेल्या आरोपीला स्थानिथ गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशच्या (Madhya Pradesh) बालाघाटजिल्या अंतर्गत येणाऱ्या आरंभा घोटी गावातून अटक केली आहे.
पुन्हा कसा पकडला?
पोलिस स्टेशनमधून पसार झाल्यानंतर आरोपी दुर्गाप्रसाद हा आपल्या बहिणीच्या गावी आपली दुचाकी घेण्यासाठी आरंभा घोटी या गावी गेला. मात्र दुर्गा प्रसादचा नातेवाईक विजय जैतवार यास पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी आधीच पोलीस स्टेशनमध्ये बोलावले होते. आणि दुर्गाप्रसाद जर तुमच्या घरी आला तर त्यास पकडून ठेवण्यास सांगितले, त्यानंतर दुर्गा प्रसाद हा आपल्या बहिणीकडे दुचाकी आणण्यासाठी गेला. आणि गावकऱ्यांनी त्याला पकडून ठेवत याची माहिती स्थानिक पोलीसना दिली. अशा प्रकारे मोठ्या खटापटी करून पोलिसांनी पुन्हा दुर्गाप्रसादला अटक केली आहे. त्यामुळे पोलिसांचं मोठं टेन्शन कमी झालं आहे.
पोलिसांची डोकेदुखी कमी झाली
आरोपी कस्टडीतून पळून जाण्याच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे अनेकदा पोलिसांवर कारवाई झाल्याचेही दिसून येते. हा आरोपी सापडला नसता तर उलट पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता होती. दुर्गाप्रसादला अटक झाली नसती तर पोलिसांची डोकेदुखी आणखी वाढली असती. मात्र आरोपी कितीही शातीर असला तरी ते म्हणातात ना कायद्याचे हात लांब असतात. पोलिसांनी चांगली फिल्डिंग लावून त्याला पुन्हा जेरबंद केले आहे. याबद्दल पोलिसांनी त्याला पकडून ठेवणाऱ्या गावकऱ्यांचेही आभार मानले आहेत. आरोपीची एक चूक त्यालाकिती महागात पडते ते या घडनेवरून दिसून येत आहे. आत त्याच्यावर पुढे काय कारवाई होतेय, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.