नवी मुंबई : विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. त्यातच अॅपच्या माध्यमातून निष्पाप मुलींची दिशाभूल करून त्यांच्यावर अत्याचार, लैंगिक शोषणाचे प्रकारही उघडकीस येत आहेत. अशाच एका प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी नराधमाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी नराधम डेटिंग अॅप (Dating App)वरुन अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर बळजबरीने अत्याचार (Abused) करायचा. याबाबत पीडित मुलींच्या वतीने तक्रारी करण्यात आल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक (Arrest) केली आहे. तळोजा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सुरजभान सिंग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सुरजभान हा ‘से हाय’ या डेटिंग अॅपवरुन अल्पवयीन मुलींशी संपर्क करायचा. त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून कुठल्याही निर्जन ठिकाणी बोलावून घ्यायचा व तेथे त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. याप्रकरणी एका पीडित युवतीने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीच्या कारनाम्याचा पर्दाफाश झाला आहे. यानंतर पोलिसांनी आरोपीला शिताफीने अटक केली आहे. ऑनलाईन डेटिंग अॅपमुळे मुलींच्या फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. ‘से हाय’ या डेटिंग अॅपवरून निष्पाप, भाबड्या अल्पवयीन मुलींशी ओळख करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखवून फूस लावायचा. मुली जाळ्यात अडकल्यानंतर आरोपी त्यांना खाजगी जागी बोलवायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा, असे तळोजा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरोपीच्या फसवणुकीची टार्गेट बनलेल्या पीडित युवतीने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीमुळे अनेक पीडित अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराला वाचा फुटली आहे. तक्रारीचा कसून तपास करताना डेटिंग अॅपच्या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी अधिक तपास केला असता यापूर्वी सुरजभान सिंग याच्याविरोधात एका महिलेने खारघर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. त्या अनुषंगाने पोलीस सध्या सुरजभानच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची चाचपणी करून अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. डेटिंग अॅपच्या प्रकरणातील पीडित मुलींनी पुढे यावे आणि त्यांच्यावरील अत्याचाराविरुद्ध रीतसर तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Accused of abusing minor girls by luring them into underage marriage through dating app arrested)