गोवा : गोव्यात फिरायला आलेल्या परदेशी महिलेचा विनयभंग करत तिच्यावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर गोव्यातील मोरजी येथे गुरुवारी भरदुपारी ही घटना घडली. याप्रकरणी पेडणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अभिषेक उमेशचंद्र शर्मा असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. यावेळी महिलेच्या बचावासाठी आलेल्या स्थानिक नागरिकावरही आरोपीने हल्ला केला. आरोपी एका रिसॉर्टमध्ये काम करतो.
उत्तर गोव्यातील मोरजी येथील एका बीच रिसॉर्टमध्ये ही परदेशी पर्यटक महिला उतरली होती. काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिच्या खोलीत एक अनोळखी व्यक्ती घुसली. यावेळी पर्यटक महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला. महिलेचा आरडाओरडा ऐकून युरेका डायस हा स्थानिक व्यक्ती तिच्या मदतीला धावला असता, तो व्यक्ती पळून गेला.
काही वेळाने पळून गेलेला व्यक्ती परत चाकू घेऊन आला. त्याने महिला पर्यटक आणि तिच्या मदतीसाठी धावून आलेला युरेका डायस या दोघांवरही चाकूने हल्ला करून तेथून पळ काढला. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले. संशयित अभिषेक वर्मा हा मूळ डेहराडून, उत्तराखंड येथील रहिवासी आहे.
याप्रकरणी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. महिलेच्या फिर्यादीवरुन पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, हरिश वायंगणकर, हवालदार तीर्थराज म्हामल, कॉन्स्टेबल कृष्णा वेळीप, सागर खोर्जुवेकर, प्रेमनाथ सावळ-देसाई, रजत गावडे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन, पोलीस उपअधीक्षक राजेश कुमार आणि पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.