नवी मुंबई : अज्ञानाचा आणि ओळखीचा गैरफायदा घेत एका विधवा महिलेला तब्बल 65 लाखांचा गंडा घातल्याची घटना नवी मुंबई येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
किरण औंद, निखिल थोरवे, भास्कर लांडगे आणि सॅम्युअल संपत कुमार अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी सॅम्युअल संपत कुमार याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
पीडित महिलेच्या पतीने निधन झाले आहे. महिलेला मराठी येत नाही. त्यामुळे पतीच्या निधनानंतर इन्शुरन्सचे पैसे मिळावे म्हणून तिने एका ओळखीच्या व्यक्तीला मदत करण्यास सांगितले.
मात्र या व्यक्तीने महिलेला मराठी येत नसल्याचा आणि ओळखीचा फायदा घेतला. आरोपीने आपल्या मित्राच्या नावे बोगस अकाऊंट खाते उघडले. महिलेचे इन्शुरन्सचे पैसे त्या खात्यात वळवले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वाशी पोलीस ठाणे गाठत आरोपींविरोधात तक्रार दिली. महिलेच्या तक्रारूवरुन पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या अन्य तीन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी चारही आरोपींना अटक केले असून, त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.