पुण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. पुण्यात भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वानवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली होती. पुणे पोलिसांनाच संरक्षणाची गरज आहे, असं बोललं जात होतं. हल्ला करणाऱ्या आरोपीच्या पुणे पोलिसांनी अवघ्या 12 तासात मुसक्या आवळल्या आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षकावर हल्ला करणारे दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई केली. अवघ्या 12 तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. निहालसिंग टाक असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी ससाणेनगर भागात सुरू असलेले भांडण सोडवायला वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. त्यावेळी यांच्यावर निहालसिंग टाक याने कोयत्याने हल्ला केला होता.
या हल्ल्यामध्ये गायकवाड जखमी झाले होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला केल्यानंतर निहालसिंगने त्याच्या साथीदारासह तिथून पळ काढला होता. त्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः या प्रकरणी जातीने लक्ष घातले होते. तसेच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विविध पथकं निहालसिंग याचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. अखेर रात्री उशिरा त्याला ताब्यात घेण्यात आले असून अटकेची कारवाई सुरू आहे.
दरम्यान, पुणे पोलीस दलातील पोलीस निरीक्षकावर असा हल्ला झाल्याने पोलीस खात्याचीही बदनामी झाली. कारण दीड दमडीचे गुडं वर्दीवर असलेल्या अधिकाऱ्यावर हल्ला करत असतील तर त्यांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही? असा प्रश्न निर्माण होतो.