दिल्ली : दिल्लीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हृदयविकाराच्या शस्त्रक्रिया झाल्याने कर्जबाजारी झालेल्या इसमाने जी शक्कल लढवली ती पाहून पोलीसही चक्रावून गेले. दिल्लीच्या ग्रेटर कैलास भागातील बिल्डरकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी भूपेंद्र हा मागील तीन वर्षांपासून कर्जबाजारी आहे. त्याच्यावर हृदयविकाराशी संबंधित शस्त्रक्रिया झाली होती. मात्र आधीच कर्जाचा बोझा असल्यामुळे त्याला वैद्यकीय उपचाराचे बिल भागवणे मुश्किल बनले. त्यामुळे भूपेंद्रने बिल्डरला धमकावून खंडणीच्या माध्यमातून पैसे उभा करण्याचा कट रचला होता. मात्र ही खंडणी उकळण्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केले. भूपेंद्रने खंडणीसाठी धमकी दिल्यानंतर बिल्डरने 10 मे रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
भूपेंद्रने फोनवरून बिल्डरला मॅसेज केला आणि आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्या मेसेजमध्ये 4 वाजेपर्यंत 2 कोटी रुपये भरण्यास सांगितले होते. त्यानंतर संध्याकाळी 5.05 वाजण्याच्या सुमारास आणखी एक मॅसेज आला. त्यात त्याने पहिल्या मॅसेजला प्रतिसाद न दिल्यास भविष्यातील परिणामांसाठी जबाबदार असेल असे म्हटले होते. बिल्डरने पोलीस तक्रारीत हे नमूद केले होते. त्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली होती.
भूपेंद्रने ज्या मोबाईल क्रमांकावरून बिल्डरला मेसेज पाठवला होता, तो मोबाईल नंतर बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे भूपेंद्रचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले होते. मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने भूपेंद्रचा थांगपत्ता लागला. तो मेहरौली परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तेथे जाऊन त्याला अटक केली. त्याने गुन्ह्यात वापरलेले सिमकार्ड आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आल्याचे दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीएसपी) चंदन चौधरी यांनी सांगितले.