डोंबिवली : विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन चांगला नफा मिळवण्याचे आमिष दाखवत नागरिकांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मग नागरिकांचे पैसे घेऊन पसार झाल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. श्रमसंपदा निधी लिमिटेड या पतपेढीत 47 ग्राहकांची एकूण 17 लाख 36 हजार 441 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पतपेढीचे संचालक मंडळ आणि शाखा मॅनेजर पतपेढीला टाळं मारुन फरार झाल्यानंतर ही फसवणूक उघडकीस आली. याप्रकरणी एका ग्राहकाच्या फिर्यादीवरुन पतपेढीचे संचालक आणि शाखा मॅनेजरविरोधात डोंबिवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप हे अधिक तपास करत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील चार रस्त्याजवळ आर पी रोडवर श्रमसंपदा निधी लिमिटेड नावाची पतपेढी होती. या पतपेढीत दैनंदिन ठेवी, आरडी, एफडी स्वरुपात 47 ग्राहकांनी 1 फेब्रुवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान 17 लाख 36 हजार 441 रुपयांची गुंतवणूक केली. पैसे मिळाल्यानंतर संचालक, शाखा मॅनेजर पतपेढीला टाळे मारुन फरार झाले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले.
याप्रकरणी परशुराम बाळू मेढेकर यांनी डोंबिवली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. मेढेकर यांच्या तक्रारीवरुन शाखा मॅनेजर सागर शंकर डोंगरे, संचालक राजेंद्र शंकरराव चोपडे, संचालक भास्कर कोंडाजी बिन्नर आणि संचालक विष्णु बाळू दिनकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच तात्काळ कारवाई करत पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. पोलीस आरोपींची अधिक चौकशी करत आहेत.