नवी दिल्ली : देशातील सोन्याची तस्करी (Gold Smuggling) रोखण्यासाठी सरकार अनेक ठोस पावले उचलत आहे. डीआरआयकडून अनेक ठिकाणी छापेमारी (Raid) सुरु आहे. अशाच एका तस्करीच्या कारवाईत डीआरआय (DRI)ला मोठे यश मिळाले आहे. ऑपरेशन ‘गोल्ड रश‘ अंतर्गत डीआरआयने 65.46 किलो सोने जप्त केले आहे. हे सोन्याची अंदाजे किंमत 33 कोटी रुपये आहे.
मिझोराममार्गे सोन्याची तस्करी करून मोठी खेप देशात येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीनुसार ऑपरेशन गोल्ड रशची योजना आखण्यात आली. ईशान्येकडून मुंबई, पाटणा आणि दिल्लीत याची तस्करी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
तस्करीत पकडण्यात आलेल्या सोन्याची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. डीआरआयला छाप्यात सोन्याची बरीच बिस्किटे सापडली आहेत, ज्यांचे एकूण वजन सुमारे 65.46 किलो आहे.
डीआरआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोन्याच्या तस्करीसाठी देशांतर्गत कुरिअर आणि लॉजिस्टिक कंपनीचा वापर केला जात होता. सोन्याची बिस्किटे विविध घरगुती वस्तूंमध्ये लपवून आणली होती.
महाराष्ट्रातील भिवंडी येथे ऑपरेशन गोल्ड रश अंतर्गत DRI ने प्रथम कारवाई केली. या कारवाईत सुमारे 19.93 किलो वजनाची 120 सोन्याची बिस्किटे जप्त केली. याची किंमत सुमारे 10.18 कोटी रुपये आहे.
तपासादरम्यान असे आढळून आले की, परदेशातून सोने प्रथम मिझोराममध्ये आले आणि नंतर तेथून त्याची खेप मुंबईत पोहोचली. यातील दोन खेपा दिल्ली आणि पाटणा येथे कुरिअरद्वारे पाठवण्यात आल्या होत्या.
यानंतर, डीआरआयने पाटणा येथील त्याच लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामावर छापा टाकून 172 सोन्याची बिस्किटे जप्त केली. या बिस्किटांचे वजन 28.57 किलो आहे आणि त्याची किंमत सुमारे 14.50 कोटी रुपये आहे.
दिल्लीतून तिसरी खेप पकडण्यात आली. येथे 102 सोन्याची बिस्किटे सापडली, ज्यांचे वजन 16.96 किलो आहे आणि किंमत अंदाजे 8.69 कोटी रुपये आहे.
डीआरआयने एकूण 394 सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. त्यांचे एकूण वजन 65.46 किलो आहे आणि एकूण किंमत सुमारे 33.40 कोटी रुपये आहे.