कराड : पाटण सडा वाघापर पठारावर हुल्लडबाजी करणाऱ्या 62 जणांवर पाटण पोलिसांनी कारवाई (Action) केली आहे. उलटा धबधबा (Waterfall) पाहण्यासाठी आलेल्या व पठारावर अनेक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्या 62 जणांसह अनेक वाहनां (Vehicles)वरही कारवाई केली आहे. यामध्ये 22 हुल्लडबाज तर 40 वाहनधारकांचा समावेश आहे. विस्तीर्ण सडा वाघापूर पठारावर साध्या वेशातील पोलीस बंदोबस्त असून, यामुळे पर्यटन स्थळावरील हुल्लडबाजीला चाप बसणार आहे. पावसाळी पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक या उलट्या धबधब्यावर येतात.
सर्वत्र प्रसिद्ध असलेला पाटण तालुक्यातील पाटण तारळे रस्त्यावरील सडा वाघापूरचा उलटा धबधबा सध्या पावसामुळे ओसंडून वाहू लागला आहे. हा उलटा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सडा वाघापूरला दाखल होऊ लागले आहेत. यावर्षी ही संख्या वाढली असून सुट्टी दिवशी तब्बल चार ते पाच हजार पर्यटक सडा वाघापूरला हजेरी लावतात.
दरम्यान, या पर्यटकांमध्ये हुल्लडबाजी करणाऱ्या युवा तरुणाईचा मोठा भरणा आहे. रस्त्यावर नाचणे पठारावर हॉर्न वाजवत गाड्या फिरवणे, गाडीतील टेप रेकॉर्डर लावून धिंगाणा घालणे, या प्रकारची हुल्लडबाजी सडा वाघापूरला मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सडा वाघापूरला तब्बल 62 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये 22 हुल्लडबाज तर 40 वाहनधारकांचा समावेश आहे. पाटण पोलिसांच्या वतीने या हुल्लडबाजांवर आता करडी नजर राहणार असून पाटण पोलीसांच्या वतीने सडा वाघापूर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला आहे. याबरोबरच पोलिसांची गस्तही सुरू राहणार असून याद्वारे हुल्लडबाजांवर अंकुश ठेवण्यात येईल अशी माहिती पाटण पोलीस ठाण्याचे पीआय चौखंडे यांनी दिली. दरम्यान हुल्लडबाज युवकांनी आपल्या हुल्लडबाजीने पर्यटन स्थळाला गालबोट लावू नये असे आवाहन चौखंडे यांनी केले आहे. (Action taken against 62 people who rioted on Patan Sada Waghapur Waterfall)