अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पालिकेच्या (Ambarnath Municipality) कर्मचाऱ्यानं एका दुकानदाराला 200 रुपयांची पावती देऊन त्याच्याकडून 1200 रुपयांची वसूली केल्याचा प्रकार घडला होता. ही बाब टीव्ही 9 मराठीने समोर आणल्यानंतर पालिकेनं या कर्मचाऱ्याची (Action against fraud municipality employee) थेट रस्ते आणि गटार सफाई करण्यासाठी बदली केली आहे. अंबरनाथ पालिकेनं काही सफाई कामगारांची शासनाच्या दंड वसुलीसाठी नियुक्ती केली होती. मात्र यापैकी सुरज गोहेर या सफाई कर्मचाऱ्यानं एका दुकानदाराला प्लॅस्टिक पिशव्या वापरल्याबद्दल दंड आकारला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे सुरज याने दुकानदाराकडून 1200 रुपये घेऊन फक्त 200 रुपयांची पावती दिली. हा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झाला. ही बाब टीव्ही 9 मराठीने समोर आणल्यानंतर अंबरनाथ पालिकेनं सुरज गोहेर याच्यावर कारवाई केलीये. टीव्ही 9 मराठीच्या (TV9 Marathi Impact) वृत्ताची दखल घेत लुटारु कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
लुटारु पालिका कर्मचाऱ्याकडून त्याच्याकडून दंड वसुलीचं काम काढून घेत त्याला पुन्हा रस्ते आणि गटार सफाईच्या कामाला लावण्यात आलंय. तर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई सुद्धा प्रस्तावित करण्यात आलीय. यात त्याची चौकशी होऊन त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. याबाबतचे कार्यालयीन आदेश अंबरनाथ पालिकेनं काढले आहेत.
सुरज गोहेर याच्यावर यापूर्वी सुद्धा व्यापाऱ्यांकडून हफ्ते मागत असल्याचा आरोप करण्यात आला होता, त्याचाही उल्लेख या कारवाईच्या आदेशात करण्यात आलाय. या कारवाईमुळे दंडवसुलीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जरब बसली आहे.
गुरुवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी पालिकेचे काही कर्मचारी एका दुकानात गेले. त्यांनी या दुकानात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर होत असल्याचं सांगत दुकानदार मनीष पटेल (Manish Patel) याला तब्बल 1200 रुपये दंड भरण्यास सांगितलं. यावेळी दुकानदाराकडे पैसे नसल्यानं त्यानं अक्षरशः बाजूच्या दुकानदाराकडून उधार घेऊन पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 1200 रुपये आणून दिले.
बघा.. अंबरनाथमध्ये पालिकेचे कर्मचारीच दुकानदारांना लुटतायत… पावती देतात दोनशेची आणि पैसे घेतात बाराशे..
व्हिडीओ – निनाद करमरकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, अंबरनाथ pic.twitter.com/23qJtBXMbk
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 4, 2022
उधारी घेऊन दुकानदारानं दंड भरला खरा. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अवघ्या 200 रुपयांची पावती दिली. त्यामुळं मनीष याने पावती 200 रुपयांचीच का दिली? अशी विचारणा केली असता, जास्त बोललास तर 25 हजार रुपयांचा दंड लावेन, असा दम देत कर्मचारी तिथून निघून गेले होते. मात्र पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा हा झोल सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी दुकानदार मनीष पटेल याने केली होती. त्यानुसार अखेर लुटारु कर्मचाऱ्यांना पालिकेनं दणका दिलाय.
धक्कादायक ! पिंपरीत आपटी बॉम्बबरोबर खेळताना एका 4 बालिकेचा मृत्यू , दोन जखमी
फिल्मी स्टाईलने गाडी घुसली किरणा मालाच्या दुकानात, चालक मद्यधुंद अवस्थेत; दुकानदारचं काय झालं