उल्हासनगर / निनाद करमरकर (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील बंडानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं उल्हासनगरमधील कार्यालय फोडण्यात आलं होतं. या कार्यालयावर पहिला दगड भिरकावणारा शिवसेनेचा शाखाप्रमुख सुरेश पाटील याला पोलिसांनी तडीपार केलं आहे. पाटील याला पोलिसांनी दोन वर्षासाठी उल्हासनगरमधून तडीपार केलं आहे. पाटील याला केवळ उल्हासनगर नव्हे तर मुंबई, ठाणे आणि नाशिक या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. यामुळे ठाकरे गटाला आणखी एक झटका बसला आहे.
सुरेश बाबुराव पाटील हा उल्हासनगर कॅम्प 1 परिसरातील शिवसेनेचा शाखाप्रमुख होता. एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला गेल्यानंतर सुरेश पाटील याने उल्हासनगरमधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं कार्यालय फोडलं होतं. त्यावेळी पाटील याच्यासह काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, सुरेश पाटील याच्यावर यापूर्वीच 4 गंभीर गुन्हे दाखल असून, 2022 साली 3 गुन्हे दाखल झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ठाणे, मुंबई आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधून 2 वर्षांसाठी तडीपार केलं आहे. उल्हासनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी याबाबत माहिती दिली.