cyber crime : वीज बिलांनंतर आता बॅंकेच्या मॅसेजद्वारे नागरिकांची होत आहे अशी फसवणूक

| Updated on: Mar 03, 2023 | 3:49 PM

बॅंकेच्या नावाने मोबाईलवर अलीकडे केवायसी किंवा अन्य माहिती अपडेट करण्याचे बोगस मॅसेज पाठवून लाखो रूपये लुटले जात आहेत.

cyber crime : वीज बिलांनंतर आता बॅंकेच्या मॅसेजद्वारे नागरिकांची होत आहे अशी फसवणूक
cybercrime
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : ऑनलाईन व्यवहार करताना खूपच काळजी घेण्यासारखी स्थिती सध्या आहे. पूर्वी बेस्ट बिलांच्या नावे फसवणुकीचे रॅकेट सक्रीय होते आता तर थेट बॅंकेच्या नावाने मोबाईलवर ( mobile )   संदेश पाठवून सर्व सामान्यांच्या खात्यातून लाखो रूपये लुटले जात आहेत. आधी  बेस्टच्या वीजबिलाचे मॅसेज पाठवून सायबर क्राईमवाले  ( cyber crime ) सर्वसामान्यांना लुटत होते, आता बॅंकेच्या नावाने संदेश पाठवून घोटाळे करीत असल्याचा संशय मुंबई सायबर पोलीसांनी व्यक्त केला आहे.

बॅंकेच्या नावाने मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज पाठवून घोटाळे करण्याची संख्या सध्या अचानक वाढली आहे. पूर्वी वीज बिल ऑनलाईन भरणाऱ्यांना बेस्टच्या नावाने खोटे मॅसेज पाठवून त्यांचे बॅंक डिटेल्स भरायला लावून बॅंक खाती रिकामी करणारी टोळी होती. या टोळीने आता बॅंकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. ही टोळी बॅंक ग्राहकांच्या मोबाईलवर बॅंकेच्या नावाने मॅसेज पाठवून बॅंक खाते बंद करण्याची धमकी देते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक बॅंक खाती बंद पडण्याच्या भितीने बॅंकेचीस डेबिट कार्ड सर्व माहिती या संदेशात आलेल्या लिंकवर भरीत असल्याने अनेकांची बॅंक खाती ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्यांनी रिकामी केली आहेत.

सारखीच ऑपरेण्डी आढळली

बॅंकेच्या टेक्स्ट मॅसेजद्वारे आर्थिक फसवणूकीचे वाढते प्रकार पाहून मुंबई सायबर क्राईम पोलिसांनी तपास केला असता. अलिकडे बेस्टच्या वीज पुरवठा होणाऱ्या ग्राहकांना जसे अलिकडे मॅसेज पाठवून घोटाळे केले होते. तीच मोडस ऑपरेण्डी या प्रकरणात वापरली जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणात पाठविलेले संदेशातील लिंक सारख्याच असल्याचे मुंबईच्या सायबर क्राईम सेलच्या अधिकाऱ्यानी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले.

केवायसी अपडेट करण्याचा संदेश

नागरिकांच्या मोबाईलवर बॅंकेच्या नावाने एकाच पद्धतीचे मॅसेज येत आहेत, त्यात : ‘Dear Customer, your account will be suspended today. Please update your KYC/link your PAN.’ असा संदेश लिहीलेला आहे. या संदेशात लिंकवर केवायसी अपडेट करण्याचा संदेश लिहीण्यात आला आहे. किंवा बॅंकेशी पॅनकार्ड लिंक करण्यात यावे. या लिंक केवळ ग्राहकांच्या खात्याचे तसेच डेबिट कार्डाचा तपशिल मिळवण्यासाठी पाठविलेल्या असल्याचे उघडकीस आले आहे. ग्राहक जशी त्यात माहीती भरतात तसे त्यांचे नेट बॅंकींग खात्यातून पैसे काढले जात आहेत.

एचडीएफसीच्या नावाने सर्वाधिक संदेश

ग्राहकांनी कोणताही ऑनलाईन बॅंकींग व्यवहार करताना वन टाईम पासवर्ड विचारला जात असतो. परंतू हे सायबर घोटाळेबाज हा पासवर्डही संबंधित फॉर्मवर भरायला सांगत असल्याने ग्राहकांच्या खात्यातील रक्कम चोरटे पसार करीत आहेत. आम्ही या घोटाळ्यात वापरलेले मोबाईल क्रमांक आणि संगणकाचा आयपी एड्रेस शोधून काढीत असून बेस्ट बिल घोटाळ्याशी त्याचा काय आणखी संबंध आहे ते तपासून पहात असल्याचे सायबरचे पोलिस उपायुक्त बलसिंग राजपूत यांनी हिंदूस्थान टाईम्सला सांगितले आहे. यातील बहुतांशी संदेश  एचडीएफसीच्या नावाने पाठविले आहेत.

पाच दिवसात 23 केसेस दाखल 

मुंबईत गेल्या पाच दिवसात अशा प्रकारे बॅंकेच्या संदेशाव्दारे फसवणूक झाल्याच्या 23 केसेस घडल्या आहेत. त्यात लाखो रूपये खात्यातून गायब करण्यात आले आहेत. ताडदेव पोलिस ठाण्यात 19,607 रूपये गायब झाल्याची केस दाखल झाली आहे तर आग्रीपाडा येथे एकाच्या खात्यातून 3.99 लाख सायबर गुन्हेगारांनी पसार केले आहेत. याशिवाय गावदेवी, ओशिवरा, शिवाजी पार्क आणि व्ही.पी. रोड पोलिस ठाण्यातून अशा प्रकारे फसवणूक झाल्याचे प्रत्येकी तीन गुन्हे दाखल झाले आहेत, तर अंधेरी, भोईवाडा, भायखळा, डी.बी.मार्ग, डी.एन. मार्ग, घाटकोपर, एन.एम.जोशी मार्ग, पार्कसाईड आणि वाकोला पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक केस दाखल झाली आहे.