नाशिक : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील अंजनेरी शिवारात असलेल्या आधारतीर्थ अनाथालयात चार वर्षीय बालकाची हत्या झालीची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बहुचर्चित असलेले आधारतीर्थ अनाथालय येथे झालेला मुलाचा मृत्यू पहिलाच आहे असे नाही. यापूर्वी देखील सहा वर्षी बालकाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, राजकीय दाबावपोटी हे प्रकरण बाहेर आले नव्हते. परंतु आता चार वर्षीय अलोकचा खून झाल्याची घटना पोलीस तपासात उघड झाल्याने आधारतीर्थच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. आणि यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये आधारतीर्थ हे परवानगी विनाच सुरू असल्याची बाब समोर आल्याने आधारतीर्थ नसून निराधारतीर्थ असल्याची चर्चा होऊ लागली आहे. आलोक शिंगारे यांच्या मृत्यूनंतर आधारतीर्थचा सुरक्षेचा मुद्दा समोर आल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनीही सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आलोक शिंगारे याच्या मृत्यूनंतर सखोल चौकशीचे आदेश दिले असून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या आहेत.
नाशिकच्या अंजनेरी शिवारात असलेल्या आधारतीर्थ अनाथालयावर आता गंभीर आरोप केले जात असून विनापरवानगी हे आधारतीर्थ असल्याचे समोर आल्याने कठोर कारवाईची मागणी देखील मृत्यू झालेल्या बालकाच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.
दीड वर्षापासून 17 वर्षापर्यन्तचे मुलं येथे राहतात, साधारणपणे शंभरहून अधिक मुलं आधारतीर्थ येथे राहतात. गोर-गरीब, अनाथ आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलं येथे राहतात.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू लागल्या नंतर आधारतीर्थला शेतकरी संघटनेचे शरद जोशी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विनायकदादा पाटील यांसह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आधार दिला होता.
लता मंगेशकर यांच्यासह अनेक कलाकारांनी मदत केली आहे, सध्या मुलांच्या जेवणाचा खर्चही माजी क्रिकेटपट्टूची पत्नी करत असल्याची चर्चा आहे, त्यामुळे आधारतीर्थच्या सखोल चौकशीत काय समोर येते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.