नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात कोयता गॅंगची दशहत पाहायला मिळत आहे. पुणे पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवाई करत कोयते जमा केले जात आहे. मात्र, तरी देखील गुन्हेगार कोयते घेऊन बिनधास्तपणे वावरतांना दिसून आले आहे. त्याचे काही ठिकाणी व्हिडिओ समोर आल्याने पोलिसांसमोरील गुन्हेगारीचे आवाहन वाढले आहे. पुण्यातील ही कोयता गॅंगची दहशत असतांना नाशिक पोलीसांच्या कारवाईवरुनही एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नाशिकच्या अंबड पोलीसांनी चक्क हार्डवेअरच्या दुकानातून कोयते जप्त केले आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील संजीव नगर येथे एक हार्डवेअर व्यावसायिक लोखंडी कोयते विकत असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती.
अंबड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून दुकानातून 12 कोयते अंबड पोलिसांनी हस्तगत केले असून विक्री करणाऱ्या संशयित आरोपीतास ताब्यात घेतले आहे.
संजीव नगर परिसरात असलेले न्यू बबलू हार्डवेअर या दुकानात विनापरवाना बेकायदा प्राणघातक शस्रांची अवैध्य विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
चक्क हार्डवेअरच्या दुकानातून कोयत्यांची विक्री होत असल्याने पुणे पोलिसांपाठोपाठ नाशिक पोलिसांसमोरील चिंता वाढली आहे.
अंबड पोलिसांनी अंबड लिंक रोडवरील एका हार्डवेअरच्या दुकानातून 12 कोयते हस्तगत केल्याने आरोपी महेबुब खानला पोलिसांनी अटक केली आहे.
कोयत्यांची कोणाला आणि कशासाठी विक्री होणार होती ? यासह अधिकचा तपास सुरू असून पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये कोयता गॅंग ऍक्टिव्ह होती का? अशी चर्चा आता नाशिकमध्ये होऊ लागली आहे.
पुण्यात पुणे पोलीसांनी आत्तापर्यंत शंभरहून अधिक कोयते ताब्यात घेतले असून गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे, त्याच दरम्यान नाशिकमध्ये कोयते विक्री होत असल्याचा प्रकार समोर आल्याने पोलीसांनी कसून तपास सुरू केला आहे.