आग्रा | 6 ऑक्टोबर 2023 : उन्मत्त माणसाची गुर्मी हे त्यांचे नुकसान तर करतेच पण अशा माणसांपासून समाजाला सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे समजातील नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ शकते. अशाच गुर्मीत बोलणाऱ्या काही तरूणांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (viral on social media) व्हायरल झाला आहे. या मुलांना कायद्याचा काहीच धाक नाही का, असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.
आग्र्यामधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे, तेथील एका कोचिंग सेंटरमध्ये हैराण करणारा प्रकार घडला आहे. दोन विद्यार्थ्यांनी कोचिंग क्लासमधील शिक्षकाला बाहेर बोलावून त्यांच्या पायावर गोळी मारली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्या शिक्षकाला रुग्णालयात दाखल केलं. पण हे एवढं मोठं कांड करूनही त्या विद्यार्थ्यांना जराही पश्चाताप किंवा केलेल्या कृत्याची भीती वाटली नाही. त्यांची मस्ती एवढी की त्यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून या घटनेची जाहीर कबूली तर दिलीच पण ‘ आत्ताशी एक गोळी मारलीये, अजून 39 गोळ्या बाकी आहेत ‘ अशी धमकी पुन्हा त्याच शिक्षकाला दिली. हा व्हिडीओ व्हायरल होताच एकच खळबळ माजली, पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेत त्याच्या आरोपी विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
हे संपूर्ण प्रकरण आग्रा येथील खंडौली तहसील भागातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालुपूर येथील सुमित रामस्वरूप नावाची व्यक्ती शाळेत शिक्षक आहेत. तसेच ते कोचिंग क्लासमध्येही शिकवतात. खंडौली येथे त्यांचे स्वतःचे कोचिंग सेंटरही आहे. ‘ गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास मी कोचिंग क्लासमध्ये मुलांना शिकवत होतो. तेव्हा माझे दोन विद्यार्थी बाईकवरून आले आणि एकाने आरडाओरड करून मला बाहेर बोलावले. मी बाहेर येताच त्या दोघांपैकी एकाने पिस्तूल काढली आणि माझ्या पायावर थेट गोळी झाडली’ असे पीडित शिक्षकाने पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले.
सुमित गोळीबारात गंभीर जखमी झाले. पिस्तूलाच्या फायरिंगचा आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक तिथे गोळा झाले आणि त्यांनी सुमित यांना रुग्णालयात दाखल केले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनाही दिली. दरम्यान सुमित हे रुग्णालयात असतानाच त्या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पोस्ट झाला आणि बघता-बघता व्हायरल झाला. 39 गोळ्या मारणे अजून बाकी असल्याचे त्यांनी त्यामध्ये म्हटले होते.
आरोपी विद्यार्थ्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांची ओळख पटवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी अल्पवयीन आहेत. सध्या त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्यांचे सोशल मीडिया अकाउंटही सीझ (बंद) केले आहे.