मनोज गाडेकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अहमदनगर | 1 नोव्हेंबर 2023 : सध्या देशभरात कांद्याच्या चढत्या भावाने खळबळ माजली आहे. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत कांद्याने सध्या खळबळ उडवली आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यं आणि दक्षिणेतील काही राज्यात कांद्याच्या दराने 70 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. तर देशातील 6 राज्यांमध्ये कांद्याची किंमत 60 रुपयांच्या पुढे पोहचली आहे. कांद्यामुळे सामान्यांच्या डोळ्यात पाणी येण्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान कांद्याला सध्या चांगला भाव आल्याने चोरट्यांचीही त्यावर नजर पडली आहे. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात असलेल्या कांदा शेड मधून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 85 गोण्या कांदा लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कांद्याच्या या चोरीमुळे कांदा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
चोरट्यांची चक्क कांद्यावर नजर
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे आडत व्यापारी बाबासाहेब खैरनार यांना चोपीमुयळे मोठा फटका बसला आहे. खैरनार यांनी एम के यांच्या शेडमध्ये कांद्याच्या जवळपास 1070 गोणी ठेवल्या होत्या. मात्र मंगळवारी रात्री उशीराच्या सुमारास अज्ञात चोरट्याने एक, दोन नव्हे तर तब्बल 85 गोणी कांदा घेऊन पोबारा केला. एवढेच नव्हे तर वीस ते बावीस गोण्या शेडजवळ रस्त्याच्या पलीकडे सोडून चोरांनी धूम ठोकली. याप्रकरणी कांदा व्यापारी बाबासाहेब खैरनार यांनी कोपरगाव तालुका पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. आणि पोलिसांनी या कांदाचोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
कांद्याचे भाव वधारले, यंदाही रडवणार का कांदा ?
सध्या देशभरातील विविध राज्यात कांद्याचे भाव पुन्हा वाढताना दिसत आहेत. दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यं आणि दक्षिणेतील काही राज्यात कांद्याच्या दराने
70 रुपयांचा टप्पा पार केला आहे. देशातील 6 राज्यांमध्ये कांद्याची किंमत 60 रुपयांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे केंद्र सरकार अलर्टवर आहे. यापूर्वीही कांद्याच्या किमती वधारल्याने देशात रोष वाढला होता. केंद्र सरकारने किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी आता तातडीने उपाय योजना केली आहे. कमी उत्पादन आणि वेळेवर पुरवठा न झाल्याने काद्याच्या भावात सातत्याने वाढ होत आहे.
निर्यात शुल्क रद्द केल्यानंतरही लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात घसरण
दरम्यान लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजार भाव वाढत असताना केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी 2 केंद्र सरकारच्या वतीने नाफेड एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला ऑफर स्टॉक मधून दोन लाख मॅट्रिक टन कांदा पंचवीस रुपये दराने बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. याला 24 तास उलटत नाही तोच कांद्याचे निर्यात मूल्य 800 डॉलर केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 40% निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर लासलगाव बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल मागे 500 ते 700 रुपयांची (गेल्या आठवड्याच्या तुलनेत) घसरण झाल्याचे दिसून आले.
चारशे वाहनातून आलेल्या कांद्याला जास्तीत जास्त 5200 रुपये, कमीतकमी 2000 रुपये तर सरासरी 4500 रुपये प्रति क्विंटल ला बाजार भाव मिळाला. गेल्या आठवड्यात 5820 रुपये इतका उच्चांकी गेलेला कांदा या आठवड्यात 4700 गेल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याला 1100 रुपये प्रति क्विंटल मागे तोटा सहन करावा लागला असल्याने कांद्यावरील सर्व निर्बंध रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.