अहमदनगर : एकाच गावातील तिघा तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यात (Ahmednagar Accident News) घडली. अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी (Kashti) गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या तरुणांचं वय प्रत्येकी 26,24 आणि 25 वर्ष होतं. काष्टी गावात या तरुणांच्या मृत्यूनंतर (Three Youths killed) एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही कळतंय.
काष्टी गावातील बाजारतळ परिसरात ऋषिकेश महादेव मोरे, वय 26, स्वप्निल सतिश मनुचार्य, वय 24 आणि गणेश बापू शिंदे, वय 25 हे तिघे दुचाकीवरुन जात होते. काल रात्री दुचाकीवरुन एकत्र जात असतेवेळी वाटेतच काळाने या तिघाही तरुणांवर घाला घातला.
ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश या तिघांचाही दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. गावातील तरुण मुलांचा अपघातात जीव गेल्यानंतर या मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.
रविवारी रात्रीच्या सुमारास ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश हे तिघे जण दुचाकीवरुन जात होते. यावेळी रस्त्यावर एक ऊसाचा ट्रॅक्टर उभा होता. दौंड पाटस रस्त्यावर त्यांची दुचाकी आली असता दुचाकीवरील तरुणांना समोर उभा असलेला ट्रॅक्टर दिसलाच नाही.
या ट्रॅक्टरला दुचाकी जोरात धडकली. मागून ट्रॅक्टरला दुचाकीने दिलेली धडक इतकी जबर होती, की तिघा तरुणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. याआधीही ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांनी जीव गमावलाय.
लातुरातही नुकताच असाच एक अपघात झाला होता. एका डॉक्टर तरुणाचा गावी घरी जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक बसल्यानं जागीच जीव घेला होता. आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आलीय.
रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉलीला मागे कोणतीही लाईट नसल्यामुळे होणार अपघात चिंता वाढवणारे आहेत. हे अपघात रोखण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रॅक्टर चालकांनीही काळजी घ्यावी, असं आवाहन जाणकारांकडून आता केलं जातंय. ग्रामीण भागातील या वाढत्या अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जातेय.