अहमदनगर : अहमदनगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे (Rekha Jare Murder Case) हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे (Bal Bothe) याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कारागृहात बोठेकडून मोबाईलचा वापर होत असल्याचं उघडकीस आलं आहे. बाळ बोठे विरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. (Ahmednagar Crime Rekha Jare Murder Case Accuse Bal Bothe found using Mobile Phone in Parner Jail)
रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी मार्च महिन्यात हैदराबादमधून अटक केली होती. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता. अहमदनगरमधील पारनेर कारागृहात काही दिवसांपूर्वी पोलिसांना मोबाईल सापडले होते. त्या प्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता कैदी बाळ बोठेनेही मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे.
रेखा जरे हत्याकांड काय?
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची गाडी अहमदनगर जवळील जातेगावच्या घाटात अडवून धारदार शस्त्राने त्यांची हत्या करण्यात आली होती. 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावर ही घटना घडली होती. यावेळी गाडीत बसलेला जरेंचा मुलगा रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने पाच आरोपींना गजाआड केलं. मात्र जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे सहभागी असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.
कोण आहे बाळ बोठे?
अहमदनगरपासून अवघ्या 17 किलोमीटरवर असणाऱ्या वाळकी इथे बाळा बोठे लहानाचा मोठा झाला. कॉलेज शिक्षणानंतर त्याला फोटोग्राफीचा छंद जडला आणि तो फोटोग्राफी करु लागला. काही फोटो वर्तमानपत्रातही येऊ लागले. त्यातच अहमदनगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार गोपाळराव मिरीकर यांच्याशी त्याची ओळख झाली. बाळा बोठेतील धडपडेपणा पाहून मिरीकरांनी त्याला पत्रकारितेत आणलं आणि कॅमेरा जाऊन लेखणी हाती आली.
शहरातील एका नामांकित वर्तमानपत्रात गुन्हेगारीचं वार्तांकन बाळा बोठे करु लागला. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली. त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. या अल्कोहोल निर्मितीत शहरातील अनेक नामांकित लोकांची नावं पुढे आली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला.
संबंधित बातम्या :
कॅमेरा, लेखणी ते चाकू, रेखा जरे हत्याकांडातील बाळ बोठे जातेगावच्या घाटात व्हिलन कसा झाला?
(Ahmednagar Crime Rekha Jare Murder Case Accuse Bal Bothe found using Mobile Phone in Parner Jail)