अकोला : अकोला रेल्वे स्थानकात एक विचित्रप्रकार समोर आला आहे. एका कुरियर बॉयकडे तब्बल 43 लाखांची रोख रक्कम मिळाली आहे. विशेष म्हणजे ती रक्कम कोणाची आहे? याचं उत्तर स्वत: कुरियर बॉयकडे नाहीय. खरंतर त्याने त्याचं उत्तर जाणीवपूर्वक दिलेलं नाही, असा अंदाज आहे. पोलीस या प्रकरणी तरुणाची चौकशी करत आहेत. पण रेल्वे स्थानकावर एका कुरियर बॉयच्या बॅगेत तब्बल 43 लाखांची रोख रक्कम मिळाल्याची बातमी समोर आल्यानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
संबंधित 22 वर्षीय तरुणाचं नाव मनोज हरीराम शर्मा असं असल्याची माहिती समोर आली आहे. तो शहरातील शास्त्रीनगर परिसरात राहतो. तो गुरुवारी अकोला स्थानकातून जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसने मुंबईला जाणार होता. त्यासाठी तो रेल्वे स्थानकावर दाखलही झाला. पण त्याची हालचाल म्हणजे त्याचं चालणं हे संशयास्पद वाटत होतं. त्याच्या जवळ असलेल्या बॅगेत लाखो रुपये होते. मुंबईच्या दिशेला जाणारी एक्सप्रेस एक नंबरच्या फलटावर थांबली होती. तो रिझर्व्हेशन केलेल्या B4 डब्ब्यात शिरला. त्यानंतर तो दरवाज्यावर आला. तिथे तो कुणालातरी हातवारे करत होता. नेमकं त्याचवेळी तो एका आरपीएफ जवानाच्या निदर्शनास आला. दोघांची नजरानजर झाली आणि अचानक मनोज दचकला.
आरपीएफ जवानाला मनोज घाबरल्याची चाहूल लागली. त्याने तातडीने मनोजच्या दिशेला धाव घेतली. त्याची चौकशी केली. पण तो समाधानकारक उत्तर देताना दिसत नव्हता. त्यामुळे आरपीएफ जवान त्याला आरपीएफ पोलीस ठाण्यात घेऊन आला. तिथे मनोज जवळ असलेली काळी बॅग चेक करण्यासाठी उघडली असता पोलीसही चक्रावून गेले. कारण त्या बॅगेत नोटांचे अनेक बंडल होते. या सर्व नोटांची किंमत तब्बल 43 लाख इतकी होती. त्यामुळे एवढी मोठी रक्कम नेमकी कुठून आणली? असं पोलिसांनी मनोजला विचारलं. पण त्याच्याजवळ समाधानकारक उत्तर नव्हतं.
आरपीएफच्या पथकाने अकोला GRP कडे आरोपी मनोजला पैशांसह सुपूर्द केलं. सध्या अकोला GRP या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीकडे पैशांशी संबंधित कोणतीही कागदपत्रे सापडली नाहीत. तसेच त्याने ती रक्कम स्वतःची किंवा त्याच्या मालकाची असल्याबद्दल कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रे सादर केलेले नाहीत. पण बॅगवर पप्पी शॉप असं लिहिलेलं होतं. दरम्यान, या संशयित आरोपी विरोधात GRP मध्ये लिखित स्वरुपात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोला GRP आणि अकोला पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
हेही वाचा :
गुप्तांगात सोनं लपवून मुंबईत आणलं, तीन स्त्रियांना शिताफीने अटक, NCB ची धडक कारवाई