नाशिक : मागील आठवड्यात म्हणजेच 25 नोव्हेंबरला नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे एका वृद्धाचा खून झाला होता. कर्डिले मळ्यात राहणारे बच्चू कर्डिल असं मयत व्यक्तीचे नाव आहे. बच्चू कर्डिले यांच्या खुनाचा उलगडा होत नसल्याने आता मुंबईतील फॉरेन्सिकच्या तज्ज्ञ पथकाची मदत घेतली जाणार आहे. सहा दिवस उलटले तरी खुनाचा उलगडा होत नसल्याने नाशिक शहर पोलिसांची डोकेदुखी वाढत चालली आहे. खरंतर शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान कर्डिले कुटुंबातील सर्व सदस्य गंगापूर रोड येथील एका लॉन्समध्ये हळदी समारंभाला गेले होते. त्यावेळी बच्चू कर्डिले यांना बरं नसल्याने ते घरीच थांबले होते. मात्र, अशावेळी कर्डिले यांच्या घरावर दरोडा पडला होता. त्यामध्ये कर्डिले यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारधार हत्याराने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. याशिवाय दागिने आणि पैसे असलेली कोठी देखील घेऊन पसार झाले होते.
नाशिकच्या अंबड परिसरात साधारणपणे दहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, त्यानुसार नाशिक पोलीसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, सहा दिवस उलटून गेले तरी अद्यापही दरोडेखोरांचा शोध लागत नसल्याने कर्डिले यांच्या खुनाचा उलगडा होत नाहीये.
शहर पोलीसांनी संपूर्ण नाशिक शहरातील विविध विहीर, तलाव आणि जंगल परिसरात पाहणी केली तरी अद्यापही कोठीचा थांगपत्ता लागत नाहीये.
असे असतांना आता नाशिक शहर पोलीसांनी मुंबई येथील फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून तपास करण्याचे ठरविले असून त्यांना लवकरच पाचारण केले जाणार आहे.
नाशिक शहरातील हा बहुचर्चित दरोडा आणि खून प्रकरणाचा उलगडा लागत नसल्याने पोलिसांवर टीका होत आहे, दरोडेखोरांचा शोध लावणे पोलीसांच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने आता मुंबई पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.