निनाद करमरकर, अंबरनाथ : अंबरनाथ (Ambernath) तालुक्यातील मलंगगड परिसरात (Malanggad) बिबट्या मध्यरात्री एका झोपडीत शिरला. बिबट्याने (Leopard Attack) तात्काळ पतीवरती हल्ला करायला सुरुवात केली, त्यावेळी बिबट्या आणि पती यांच्यात जोरदार झटापट सुरु झाली. झोपडीतील झटापट इतकी जोरात होती की, शेजारी असलेल्या पत्नीला जाग आली. धाडसी पत्नीने पहिल्यांदा हातात मोठी काठी घेतली. त्यानंतर काहीवेळी झोपडीत संघर्ष झाला.
मलंगगड परिसरातील जकात नाका भागात पप्प्या बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपलेलं होतं. त्यावेळी अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला जोरदार हल्ला केला. त्यावेळी झोपेत गोंधळलेल्या पप्याने प्रतिकार केला, परंतु तो अपुरा पडला.
या गोंधळाने जागा झालेल्या सखुबाईने त्वरित मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिमतीने प्रतिकार केला. बिबट्याला पळवून लावलं. मात्र बिबट्याशी झालेल्या झटापटीत तिचा पती पप्या हा जखमी झाला आहे. यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.पतीच्या चेहऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सखुबाई पवार यांनी धाडसाने बिबट्याला पळवून लागल्याने त्यांचं सगळीकडे कौतूक होतं आहे.