सावंतवाडीमधील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळी बांधलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिला आढळली होती. या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली. तिच्या जबाबानुसार, पोलिसांनी तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र आता या प्रकरणात नवा, मोठा ट्विस्ट आला आहे.
सावंतवाडी रोणापाल-सोनुर्ले येथील जंगलात एक अमेरिकन महिला सापडली होती. ललिता कायी कुमार एस असं तिचं नाव. या महिलेला साखळदंडाने करकच्चून बांधून जंगलात सोडण्यात आले होते. पण तिचं नशीब बलवत्तर म्हणून तिची लवकर सुटका झाली. तामिळनाडूमध्ये राहत असलेली महिला जंगलात कशी सापडली? असे अनेक सवाल उपस्थित केले जात होते. गुराख्याला महिला तिथे बांधलेल्या अवस्थेत सापडली होती. पोलिसही त्या ठिकाणी पोहोचले पण पीडित महिला अशक्त असल्याने तिला काही बोलता येत नव्हतं. थोड्या काळाने तिने दिलेल्या जबाबावरून तिच्या नवऱ्याच्या दिशेने संशयाची सुई फिरली होती. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला होता.
मात्र आता याप्रकरणात एक मोठा, नवा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान एक वेगळीच माहिती समोर आली आहे, ती ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्या अमेरिकन महिलेला इतर कोणी नव्हे तर स्वतःच झाडाला साखळीने बांधून घेतल्याचं समोर आलं आहे. सदर महिला मानसिक आजाराने ग्रस्त असून त्या महिलेना आपण, स्वतःच स्वतःला बांधून घेतल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.
यापूर्वी तिने आपल्याला आपल्या पतीने जंगलातील झाडाला बांधून ठेवत मरण्यासाठी सोडून दिल्याचा दावा केला होता. मात्र पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता, त्या महिलेने ही कबुली देत स्वतःच झाडाला साखळीने बांधून घेतल्याचे कबूल केले. सिंधुदुर्ग पोलिसांनी नोंदवलेल्या सविस्तर जबाबात ही बाब समोर आली आहे. त्यामुळे आता प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.
काय आहे प्रकरण ?
जुलै महिन्याच्या अखेरीस सावंतवाडीमधील सोनुर्ली-रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळी बांधलेल्या अवस्थेत एक अमेरिकन महिला आढळली होती. ललिता कायी कुमार एस हिला उपचारांसाठी पोलीस बंदोबस्तात गोवा बांबोळी रुग्णालयात हलवण्यात आले. मूळची अमेरिकेतील असलेली ललिता ही काही काळापासून तामिळनाडूत रहात होती.
ती रोणापाल जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत गुराख्यांना आढळली. सावंतवाडी व बांदा पोलिसांनी या महिलेला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ते यांच्या मदतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. गेले 40 दिवस ती उपाशी असल्याने बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. सुरुवातीला तिने कागदावर इंग्रजी भाषेतून लिहून देत आपल्यावर पतीने अत्याचार करून घातक आणि चुकीची औषधे दिल्याचा दावा तिने केला होता. तसेच याठिकाणी जंगलात आपल्याला बांधून ठेवल्याचेही तिने सांगितले होते. अन्न न मिळाल्याने ती विदेशी महिला अशक्त बनली होती. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला.
पतीविरोधात गुन्हा
मात्र महिला प्रकृती अस्वस्थामुळे असंदीग्ध माहिती देत असल्याने पोलिसांसमोर माहिती मिळविण्याचे आव्हान निर्माण झाले होते. या महिलेचा जबाब घेण्यात आला. तेव्हा तिच्या नवऱ्यानेच तिला जंगलात सोडल्याचं आढळून आलं. तिच्या नवऱ्याचं नाव सतीश असं. पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र त्या महिलेच्या अधिक चौकशीत तिने कबुली दिली की तिने स्वत:च स्वत:ला बांधून घेतले. त्यामुळे आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला असून आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.