नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील (UP) अमेठी (Amethi) जिल्ह्यात रविवारी रात्री उशिरा एक भीषण रस्ता अपघात झाला. ट्रक आणि बोलेरो यांच्यात झालेल्या समोरासमोर झालेल्या धडकेत बोलेरोमधील सहाजण जागीचं ठार झाले. तर चारजण जखमी झाले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज पोलीस स्टेशन (Gauriganj Police Station) हद्दीतील बाबूगंज परिसरात हा अपघात झाला. रविवारी मध्यरात्रीनंतर 12.15 वाजण्याच्या सुमारास लग्नाहून परतणाऱ्या बोलेरोचा भीषण अपघात झाला. रायबरेली जिल्ह्यातील नसीराबाद भागात लग्नाहून परतणारी बोलेरोमध्ये काही मुलेही होती. गौरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबूगंजमध्ये बोलेरो पोहोचली असतानाच समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली.
वेगवान बोलेरो आणि ट्रकची धडक इतकी जोरदार होती की बोलेरोचा चक्काचूर झाला आहे. दोन वाहनांच्या धडकेचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळाकडे धावले. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी बोलेरोमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले, अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सर्वांना बोलेरोमधून बाहेर काढले आणि त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले, तेथे डॉक्टरांनी सहा जणांना मृत घोषित केले. अन्य चार जखमींवर उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताचे कारण जास्त वेग असल्याचा संशय आहे.