निलेश दहात, चंद्रपूरः अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणं भाजप नेत्याला चांगलंच महागात पडलंय. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी त्याला वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. खेमदेव गरपल्लीवार (Khemdev Garpalliwar) असं या व्यक्तीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. अमृता फडणवीस यांचं एक पंजाबी गाणं नुकतंच रिलीज झालंय. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायावर मत मांडलं होतं. ते ऐकून गरपल्लीवार यांनी यासंबंधीची आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यामुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते.
अमृता फडणवीस नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या घडामोडींवर त्या आपलं मत मांडत असतात. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद वादावरही त्यांनी मत मांडलं होतं.
त्यानंतर त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना वेश्या व्यवसायावर भाष्य केलं होतं. वेश्या व्यवसाय अधिककृत करून अशा महिलांना परवाना दिला जावा, असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. देह विक्री हा पुरातन व्यवसाय आहे. अशा महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून राहतं. त्यामुळे देह विक्रय करणाऱ्या महिला खऱ्या अर्थाने समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. अशा महिलांना समाजात मानाचं स्थान मिळालं पाहिजे, असं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं होतं.
यावरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्यापैकीच एक खेमदेव गरपल्लीवार यांची प्रतिक्रिया होती. खेमदेव गरपल्लीवार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे भाजप नेत्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. खेमदेव यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातून आता हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
गरपल्लीवार हे गोंडपिंपरी नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांचे पती आहेत. त्यांच्यावर गोंडपिंपरी पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ, धमकावणे, जमीन बळकावणे, विनयभंग या सारखे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे त्यांनी काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. जुलै 2022 मध्ये अमृता फडणवीस यांनी वेश्याव्यवसाया बाबत केलेल्या वक्तव्यावर गरपल्लीवार यांनी फेसबुक आक्षेपार्ग पोस्ट लिहिली होती. या संबंधात त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला होता. या गुन्ह्याचा देखील त्यांच्या तडीपारीच्या प्रस्तावात करण्यात आला आहे.