ठाणे : एखाद्या चित्रपटात किंवा गुन्हेगारी मालिकेत शोभेल अशी घटना ठाण्यातील कोपरी परिसरात उघडकीस आली आहे. एका ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करण्यासाठी तिघे जण घुसले. मुद्देमाल घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ज्वेलर्सचा मालक अचानक आला आणि चोरट्यांचा प्लान फसला. दोघे जण पळून जाण्यास यशस्वी झाले तर एक जण दुकान मालकाच्या हाती लागला. दुकानमालकाने या चोराला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. ठाण्यातील कोपरी परिसरातील भवानी ज्वेलर्स दुकानात हा चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सदरची संपूर्ण चोरीची घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, दिवसाढवळ्या झालेल्या चोरीच्या प्रकाराने सर्व दुकानदारांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
ठाण्यातील कोपरी परिसरात भवानी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. हे दुकान लुटण्यासाठी या चोरट्यांनी परफेक्ट प्लान केला. यासाठी त्यांनी दुकानाच्या शेजारच्या कारपेंटरच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली.
कारपेंटरच्या दुकानात काम करत दुकानाची सर्व माहिती मिळवली. सोमवारी ज्वेलर्सचे दुकान बंद असल्याने चोरट्यांनी या दिवशी आपला प्लान अंमलात आणण्याचे ठरवले.
सोमवारी दुपारी चोरट्यांनी दुकानात घुसण्यासाठी आपल्या दुकानातून भिंतीला भगदाड पाडले आणि ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. आपला प्लान यशस्वी झाला असे चोरट्यांना वाटत असतानाच अचानक दुकानाच्या मालकाने दुकानाचे शटर उघडले. यानंतर चोरट्यांना पळता भुई थोडी झाली.
नेमके त्याचवेळी काहीतरी कामानिमित्त दुकानाचे मालक तेथे आले. दुकानात लाईट दिसल्याने त्यांना संशय आला म्हणून त्यांनी दुकानाचे शटर उघडले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
यावेळी दोघे जण तेथून पळून जाण्यास यशस्वी झाले. तर एक जण दुकानमालकाच्या तावडीत सापडला. दुकानमालकाने या चोरट्यांची चांगली धुलाई केली आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.
याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका चोराला 4 लाखाच्या दागिन्यांसह अटक केली असून, अन्य दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.