नाशिक : नाशिक शहरातील गुन्हेगारांनी आता व्यायामप्रेमींना लक्ष केल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. अशा वातावरणात व्यायाम केल्यास शरीरसाठी लाभदायी असतो. त्यामुळे जॉगिंग ट्रॅक, किंवा स्विमिंगसाठी अनेक नागरिक पहाटेच घराबाहेर पडत आहे. हीच संधी साधून चोरटे चोरी करत आहे. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथे मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती, त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. हीच संधी चोरट्यांनी हेरली आणि चार ते पाच वाहनांच्या काचा फोडून महागड्या वस्तु लंपास केल्या आहे. यामध्ये लॅपटॉप, मोबाईल आणि रोकड चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. मॅरेथॉनच्या धावपळीत मोबाइल जवळबाळगणे अनेक जण टाळतात, त्यामुळे आपल्या कारमध्ये मोबाइल ठेवत असतात, त्यामुळे ही संधी पाहून चोरट्यांनी हातसफाई केली आहे.
नाशिक शहरात जबरी चोरी, घरफोड्या, खून अशा घटना घडत असतांना चोरट्यांनी नवी संधी शोधली असून यामध्ये व्यायामप्रेमींना मोठा फटका बसला आहे.
गोल्फ क्लब मैदान, जलतरण तलाव, टिळकवाडी आणि शासकीय विश्रामगृह परिसरातील लावण्यात आलेल्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहे.
मुंबई नाका आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून शहर पोलीसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे चोरटयांचा शोध घेतला जात आहे.
व्यायामप्रेमी पहाटेच्या वेळी घराच्या बाहेर पडलेले पाहुन आणि परिसरातील गर्दी पाहून चोरट्यांनी शक्कल लढवली होती, त्यात ते यशस्वी झाले असले तरी आता पोलिसांना त्यांच्या कारवाईत यश येणे महत्वाचे झाले आहे.
वाहनाच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल, जॅकेट, रोकड आणि महागड्या वस्तु चोरीला गेल्या आहेत, त्यात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहेत.