नाशिक : नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश सर्वसामान्य नाशिककरांना पडू लागला आहे. त्याचे कारण म्हणजे सर्वसामान्य नाशिक करांच्या वाट्याला चोऱ्या, घरफोडी, सोनसाखळी चोरी, हाणामाऱ्या अशा घटना येत होत्या पण आता थेट हल्लेखोरांनी पोलीस हवालदारालाच लक्ष करत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. वाडीवऱ्हे येथील कवटी फाटा पोलीस चौकीच्या मागे हॉटेल ब्रम्हगिरी जवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश पाटील, निवृत्ती तातडे यांना संशयित आरोपी यांनी आमचे वादात का पडले या कारणावरुन कुरापत काढली आणि प्राणघातक हल्ला केला. यामध्ये हवालदार योगेश पाटील आणि निवृत्ती तातडे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दरम्यान वाडीवऱ्हे येथे झालेल्या या हल्ल्यात संशयित आरोपी सारंग माळी याने पोलीस हवालदार योगेश पाटील यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला.
या हल्ल्यात योगश पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासोबत असलेल्या तुषार भागडे याने निवृत्ती टायडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारत गंभीर जखमी केले आहे.
वाडीवऱ्हे पोलीसांनी या हल्ल्याबाबत गुन्हा दाखल केला असून कसून तपास सुरु केला आहे. स्थानिक गुन्हे पोलीस हवालदार प्रविण भाऊराव मासुळे यांनी या हल्ल्याची फिर्याद दिली आहे.
भा. द.वि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी अटक करण्यात आले असून आज न्यायालयासमोर हजर केले आहे.
यामध्ये सारंग रंगनाथ माळी, तुषार प्रकाश भागडे, नागेश हरिश्चंद्र भंडारी,पुरुषोत्तम संजय गिरी यांना इगतपुरी येथून अटक केली आहे.
दरम्यान या घटणेवरुन पोलिसांचे भय राहिले नाही का ? हल्लेखोर थेट पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करेपर्यन्त हिंमत कशी येते अशी चर्चा नाशिकमध्ये होऊ लागली आहे.