नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखे (Crime Branch)ने विविध राज्यांमध्ये हायटेक घरफोड्या (Burglary) करणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक (Gang Arrest) केली आहे. ही टोळी महागड्या कार आणि वॉकी टॉकी वापरून घरफोड्या करीत असे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर उत्तर प्रदेश राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या टोळीने 21 घरफोड्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. अनुप सिंग (रा.भोपाळ, मध्य प्रदेश), अभिषेक सिंग (रा. भोपाळ मध्य प्रदेश), अमित ओम प्रकाश सिंग (रा. भोपाळ मध्य प्रदेश) आणि इमरान अलवी (रा. हापोड, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीने 26 जून रोजी नागपुरात चार ते पाच ठिकाणी घरफोड्या केल्या. पोलिसांनी आरोपींकडून चार वॉकी टॉकी, घराचे कुलूप तोडण्यासाठी हायटेक पद्धतीने वापरण्यात येणाऱ्या मशीन, 6 नंबर प्लेट असा दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागपूर गुन्हे शाखेचे पथक या घरफोडीच्या गुन्ह्यात असलेल्या आरोपींचा शोध घेत होते. यावेळी काही संशयास्पद व्यक्ती कारमध्ये बसून दुसऱ्या राज्यात जात असताना अनेक ठिकाणी कारची नंबर प्लेट बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच आधारावर पोलिसांनी या टोळीचा आणि ते वापरत असलेल्या कारचा शोध सुरू केला. ही टोळी शनिवारी दुपारी काटोल नाक्यावरून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नागपूर शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांनी वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहन चालकाने वाहन न थांबवता पुढे नेले. परंतु चारही बाजूने पोलिसांनी घेरल्यानंतर पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. आरोपींना त्यांचा पोलीस शोध घेऊ शकतात. तसेच पोलीस इलेक्ट्रॉनिक सर्विलंसची मदत घेऊन त्यांना शोधू शकतात हे माहीत असल्यामुळे ते गुन्ह्याच्या ठिकाणी मोबाईल वापरत नव्हते. वॉकी टॉकीजच्या माध्यमातून ते एकमेकांशी संपर्क करायचे. (An inter state burglary gang was arrested in Nagpur)