परसोडी/नाग : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने राज्य सराकारने कोरानाचे राज्यातील सर्व नियम शिथिल केले. त्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर राज्यात सगळे कार्यक्रम धामधुडाक्यात करण्यात येत आहेत. तसेच लग्न (Marriage) सराई ही झाल्याने अनेकांनी गुडघ्याला बांधलेले बाशिंग डोक्यावर जाण्याला मुहूर्त लागला आहे. पण त्यातच अपघात होण्याचे प्रमाणही वाढल्याने अनेकांच्या घरात होत्याचं नव्हतं होत आहे. अशीच घटना जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग ते पाऊनगाव मार्गावर घडली. गावातील मित्राचे लग्नाला दुचाकीने (two-wheeler) जाताना एकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. मंगेश राजकुमार भागडकर (वय- 31 रा. अऱ्हेर नवरगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. तर विकेश सुरेश करणकर (वय- 25 रा. अऱ्हेर नवरगाव .ता. ब्रम्हपुरी .जि. चंद्रपुर) असे जखमीचे नाव आहे. त्याला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी (rural hospital) भरती करण्यात आले आहे.
मिळालेली माहिती अशी की, गावातील मित्राचे लग्नाला मयत राजकुमार आणि विकेश दुचाकीने जात होते. त्यांची दुचाकी लाखांदूर तालुक्यातिल परसोडी/नाग ते पाऊनगाव मार्गावर आली असता विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात टीप्परने त्यांना धडक दिली. यावेळी अपघाताची माहिती मार्गावरील प्रवासी नागरिकांना होताच त्यांनी तात्काळ जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तर मंगेश गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगेशचा मृत्यू झाला.
दरम्यान जखमी विकेश वर स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली असून पोलिस आरोपी टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत.