मोबाईल हा आजकाल लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. बसता, उठता, सकाळी झोपेतून उठल्यावर, रात्री झोपण्यापूर्वी लगेच हातात मोबाईल घेतला जातो. सतत काही ना काही चेक केलं जातं किंवा मग लोकं मोबाईलवर बोलण्यात सदैव बिझी असतात. पण याच मोबाईलच्या अतिरेकामुळे तोटाही होतो. लोकांचा एकमेकांशी समोरासमोर जास्त संवादच उरलेला नाही. याच मोबाईलच्या नादातून डोंबिवलीत महाभारत घडलं आहे. पत्नी सतत मोबाईलवर कोणाशी तरी बोलते याचा राग आल्याने एक इसमाने त्याच्या बायकोवर चाकूने हल्ला करत तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला.
या हल्ल्यात पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हल्लेखोर पतीचा शोध सुरू केला आहे. राजू शामुवेल हिवाळे (५३) असे हल्लेखोर पतीचे नाव तो विक्रोळीत एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याला मद्य पिण्याचेही व्यसन आहे. पत्नीवर हल्ला केल्यानंतर आरोपी राजू तेथून फरार झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोबिवली पूर्वेतील नांदिवली टेकडी येथील एका सोसायटीत हा धक्कादायक प्रकार घडला. या सोसायटीमध्ये आरोपी राजू हिवाळे आणि त्याची पत्नी सुरेखा हिवाळे (४७) हे दोघे राहतात. पत्नी सुरेखा मोबाईलवर अन्य कोणाशी तरी सतत बोलत असते याचा राग पती राजू याच्या मनात होता. या विषयावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. रविवारी सुट्टी असल्याने तक्रारदार हिवाळे यांची मुलं बाहेर गेले होते. रात्री ते घरी आले. त्यांनी आई-वडिलांसाठी जेवण आले होते. मात्र त्याच्या आईने, सुरेखाने जेवणास नकार दिला.
याच मुद्यावरून राजू आणि सुरेखा यांच्यात भांडण सुरू झाले. यावेळी दोघांनी मद्य सेवन केले होते. दोघांचा मुलांनी पुढाकार घेऊन मिटविला. त्यानतंर सगळेजण झोपले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अचानक सुरेखा यांच्या किंचाळण्याचा जोरदार आवाज आला. ते ऐकून सगळेजण ताडकन उठले आणि बाहेर धाव घेतली. समोरचं दृश्य पाहून सगलेच हबकले. त्यांचे वजील, राजू यांनी सुरेखा हिच्यावर धारदार चाकूने वार करून तिला जीवानिशी मारण्याचा प्रयत्न केला. कुटुंबियांनी तिला लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची परिस्थिती गंभीर असल्याने तिला सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर आरोपी राजू फरार झाले. या प्रकरणी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार आरोपी राजू याचा शोध घेत आहेत.