मुंबई : पुरोगामीत्वाचे पोवाडे गायले जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही महिलांना त्यांच्या चारित्र्यसंपन्नतेची परीक्षा द्यावी लागते. जात पंचायतींकडून महिलांवर होणारे अमानुष अत्याचार आजही सुरुच आहेत. जात पंचायतीचे अघोरी आणि अन्यायी न्यायनिवाडे आणि दिलेल्या जाणाऱ्या शिक्षेचे प्रकार तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असतील. असाच अमानवी स्वरुपाच्या परीक्षेचा प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. आपण चारित्र्यवान आहोत हे सिद्ध करण्यासाठी एका महिलेला उकळत्या तेलात हात घालावा लागतोय.(Another viral video of caste panchayat’s inhumane judgment)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पारधी समाजातील एका व्यक्तीनं आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशावेळी या समाजातील जायपंचायतीनं महिलेला एक परीक्षा द्यायला सांगितली. संबंधित महिलेच्या पत्नीनं दगडांची चूल मांडली. चुलीत आग लावून कढई ठेवली आणि कढईत तेल ओतलं. ते उकळल्यावर नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने त्या कढईत 5 रुपयांचं नाणं टाकलं आणि उकळत्या तेलात हात घालून ते नाणं काढण्यास संबंधित महिलेला सांगण्यात आलं.
या अघोरी आणि अमानुष परीक्षेचा परिणाम त्या महिलेला माहिती होता. ती गयावया करत तेलात हात घालण्यास नकार देत होती. पण आपल्या पत्नीचं चारित्र्य तपासण्यासाठी तिच्या पतीनं तेलात हात घालण्यासाठी बळजबरी केली. या परीक्षेत पास-नापास कसं ठरतं हा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर उकळत्या तेलातील नाणं बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचं चारित्र्य शुद्ध! जर तिचा हात भाजला तर तिला चारित्र्यहीन असल्याचं जाहीर केलं जातं!
अशा अमानवी परीक्षेला ही महिला बळी पडल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. कारण, तिच्या पतीने तिला उकळत्या तेलात हात घालायला लावल्यावर स्वाभाविकरित्या तिचा हात भाजला आणि ती चारित्र्यहीन ठरली. महत्वाची बाब म्हणजे नवरा म्हणवणाऱ्या व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडीओ बनवला आहे आणि तो व्हायरलही केलाय. हा व्हिडीओ पारधी समाजातील असल्याचं त्यांच्या भाषेवरुन कळून येत आहे. पण तो नेमका कोणत्या भागातील आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.
दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यावर जात पंचायत विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपींना शिक्षा करण्याची मागणी होत आहे. जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी याबाबत आवाज उठवला आहे. असे न्यायनिवाडे हे पूर्णपणे अंधश्रद्धेवर आधारित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागानं या घटनेचा पाठपुरावा करुन आरोपीला शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
डायरीत 22 नोव्हेंबर 2021 पानावर सुसाईड नोट, पत्नी-दोन मुलांना इंजेक्शन देऊन डॉक्टरचा गळफास
CCTV Video: पुण्याच्या एटीएममध्ये ‘मुळशी पॅटर्नचा’ थरार, तलवारी, कोयत्याचा हल्ला सीसीटीव्हीत कैद
Another viral video of caste panchayat’s inhumane judgment