नालासोपारा / विजय गायकवाड : नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्कमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आणलेले 25 लाख 20 हजार रुपये किमतीचे 126 ग्रॅम वजनाचे एमडी मॅफेड्रॉन नावाचे अमलीपदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने ही कारवाही केली. याबाबत NDPS कायदा 1985 चे कलम 8 (क), 22 (क) प्रमाणे तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केले आहे. गीतेश अनंत प्रभू असे अटक आरोपीचे नाव असून, तो टिटवाळा येथील रहिवासी आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अमलीपदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे यांना 25 मार्च रोजी गुप्तबातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. टिटवाळाहून एक नागरिक अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी नालासोपारा येथे येणार असल्याचे पोलिसांना कळाले होते. मराठे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे, अमोल अंबावणे यांच्यासह पोलीस पथक तयार करून नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क येथे सापळा रचला.
यावेळी गणेश आपर्टमेंटजवळ एक इसम निळ्या प्लास्टिक रंगाची पिशवी घेऊन संशयितरित्या उभा होता. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी झाडाझडती घेतली असता, त्याच्या बॅगेमध्ये अमलीपदार्थ असल्याचे समोर आले. पंच आणि तज्ज्ञांच्या साक्षीने याची माहिती केली असता हे एमडी मॅफेड्रॉन नावाचे अमलीपदार्थ असल्याचे समोर आले. हे अमलीपदार्थ 126 ग्रॅम वजनाचे असून, त्याची बाजारात किंमत 25 लाख 20 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अमलीपदार्थ विक्री आणि खरेदी करणाऱ्या टोळी सक्रिय झाल्या आहेत. नालासोपारा पूर्व प्रगती नगर, ओसवाल नगरी, सेंट्रल पार्क या परिसरात यांचा वावर जास्त आहे. प्रगती नगर परिसरात नायजेरियन नागरिकांची वस्ती मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्याकडून अमलीपदार्थ विक्री, खरेदी मोठया प्रमाणात होते. यावर तुळिंजचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी अनेक वेळा कारवाई केली आहे.
दोन दिवसांपूर्वी एका नायजेरियन व्यक्तीसह 7 लाखांचे अमलीपदार्थ जप्तही केले आहेत. पण तरीही अमलीपदार्थाचे रॅकेट थांबता थांबत नाही. या रॅकेटवर कडक कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालय हद्दीतील पथक अमलीपदार्थावर करवाईसाठी सज्ज झाले आहे.