नाशिक : नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या ( Nashik Police ) समोरच मुलीसह आईवर एकाने हल्ला करत स्वतःवर चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलीस दलासह ( Nashik Crime News ) नाशिक शहरात खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेमागील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल बारा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेसह मुलीवर प्राणघातक हल्ला असल्याचे समोर आले आहे. यानंतर प्रियकराने स्वतःवर वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान हल्लेखोर प्रियकर हा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे समोर आले आहे.
नाशिक उपनगर पोलीस ठाण्याच्या समोर एका महिलेसह तीची मुलगी उभी होती. बारा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियकरासोबत महिलेचा वाद झालेला होता. त्यावरून महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती.
तिथेच प्रियकर आला आणि त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. याच वेळी त्याने त्याच्याकडे सोबत असलेल्या चाकूने महिलेसह मुलीवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. यानंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतले आहे.
हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर पोलीस कर्मचारी यांनी धाव घेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आणि जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल केले. आता त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
यामध्ये प्रियकराने महिलेला एक फ्लॅट घेऊन दिला होता. त्याच्या ताब्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला हा वाद त्याच फ्लॅटवर झाला होता. त्यानंतर हे प्रकरण चिघळल्याने पोलीस ठाण्यात महिलेने धाव घेतली होती.
महिला तक्रार करेल या भीतीने प्रियकर महिलेचा पाठलाग करत आला होता. त्याच दरम्यान त्याने प्राणघातक हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियकर जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात कर्मचारी आहे.
अर्चना बाळासाहेब वाघमारे आणि सरजीत झांझोटे हे बारा वर्षांपासून एकत्र राहत आहेत. झांझोटे याने महिलेला फ्लॅट घेऊन दिला असून त्यावरून हा वाद उभा राहिला आहे.
यातील विशेष बाब म्हणजे 15 दिवसांपूर्वी उपनगर पोलिस ठाण्यातच एकमेकांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी पुन्हा पोलीस ठाण्याच्या परिसरात समोरासमोर आल्यानंतर हा प्रकार घडला आहे.
नाशिकच्या जिल्ह्या शासकीय रुग्णालयात आणि पोलीस दलासह नाशिक शहरात या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. उपनगर पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहे.