पुणे : मोटार परिवहन विभगातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश महाजन यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येच्या या घटनेमुळे पुणे पोलिसात एकच खळबळ उडाली आहे. राजेश महाजन हे रिजर्व होते. ते मोटार परिवहन विभागात कार्यरत होते. त्यांनी आज (30 ऑगस्ट) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.
राजेश महाजन यांनी अचानक आत्महत्या केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तसेच सहायक पोलीस निरीक्षकाच्या आत्महत्येचे वृत्त संपूर्ण शहरात वाऱ्यासारखं पसरलंय. पोलीस निरीक्षकाने आत्महत्या का केली असावी? असा सवाल अनेकांना सतावत आहे. पण त्यांच्या परिजनांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजेश महाजन यांनी नैराश्यातून आत्महत्या केली. त्यांच्या पत्नीचे गेल्या महिन्यात निधन झालं होतं. त्याच शोकात ते नैराश्यात गेले होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जिल्ह्यात गेल्या महिन्यातच एका महिला पोलिसाच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. पिंपरी चिंचवडमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने 5 जुलैला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दुपारी दीडच्या सुमारास वाकडमध्ये ही घटना समोर आली होती. या आत्महत्येने पिंपरी चिंचवड पोलिस दलात एकच खळबळ उडाली होती.
श्रद्धा जायभाये असं आत्महत्या करणाऱ्या 28 वर्षीय महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव होतं. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समोर आलं नव्हतं. श्रद्धा यांचे पती केरळमध्ये नेव्हीत नोकरी करतात. त्यांना दोन वर्षाची एक मुलगी आहे. तिला पुण्यातील नातेवाईकांकडे ठेऊन, गळफास घेत श्रद्धा यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं.
पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या एका एसटी (राज्य परिवहन मंडळ) चालकाने काल (29 ऑगस्ट) नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री इथे घडली. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जुलै महिन्याचे वेतन तातडीने देण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी सोमवारी 30 ऑगस्ट रोजी आगाराबाहेर आंदोलन करणार आहेत. संघर्ष एसटी कामगार युनियन या संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
संघर्ष एसटी कामगार युनियनच्या वतीने ऑगस्ट महिन्यामध्ये कामगारांना वेतन वेळेत मिळावे म्हणून औद्योगिक न्यायलयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने 14 ऑगस्ट 2021 रोजी कामगारांच्या बाजूने निवाडा देत वेतन तातडीने दिले जावे, असे आदेश काढले. तरीही कोर्टाच्या आदेशाचा अवमान करत एसटी महामंडळाने कामगारांना वेतन वेळेत दिले नाही. त्याच्या परिणामी गरिबी व दारिद्र्याला कंटाळून चालक कमलेश बेडसे यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष जगनारायण कहार यांनी केला आहे.
हेही वाचा :
भावजयी शेतात शौचास गेली म्हणून दीर भडकला, आधी शिवीगाळ, नंतर भावासोबत हाणामारी, मरेपर्यंत मारलं