नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने ( ACB ) केलेल्या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकालाच लाच घेतांना रंगेहात पकडले आहे. गुरुवारी दुपारच्या वेळेला पंधरा हजार रुपयांची लाच ( Bribe ) घेतांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पतसंस्थेच्या थकीत कर्जदारांना 101 ची नोटीस देण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. एकनाथ प्रताप पाटील असं लाचखोर सहाय्यक निबंधकाचे नाव आहे. नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईवरुन सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील एका पतसंस्थेत काही थकीत कर्जदार आहे. त्यांना कर्ज वसूली करिता नोटिस बजावली जाते. त्यासाठी 101 चे दाखले उपलब्ध करून घ्यावे लागतात. हे दाखले सहकार निबंधक देत असतात.
एकूण 17 प्रकरणे असल्याने पतसंस्थेकडे दीड हजार रुपये प्रमाणे लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये थकीत कर्जदार यांना 101 प्रमाणे नोटिस दिली जाणार होती. असे एकूण साडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.
या संपूर्ण प्रकरणी तक्रारदार यांनी नाशिकच्या एसीबी कार्यालयाशी संपर्क साधला. संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि त्यानुसार एसीबीच्या पथकाने सिन्नर सहकार कार्यालयात सापळा रचला होता.
एकनाथ प्रताप पाटील यांच्या कार्यालयात साडेपंचवीस हजारापैकी पंधरा हजार देत असतांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. एसीबीचा सापळा यावेळी यशस्वी झाला असून सहकार क्षेत्रात या कारवाईने खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे ही संपूर्ण कारवाई निवडणुकीच्या धामधुमीत करण्यात आली आहे. सिन्नर तालुका खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. त्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अटक करण्यात आली तेच मुख्य निवडूक अधिकारी आहे.