कमी पैशात परदेशात संपर्क, रत्नागिरीतील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई

| Updated on: Aug 14, 2021 | 10:26 AM

दहशदवाद विरोधी पथकासह रत्नागिरी पोलिसांनी कमी पैशात देशासह परदेशात संपर्कासाठी चालवले जाणाऱ्या अवैध कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश केलाय. यासाठी इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिम'चा उपयोग केला जात होता.

कमी पैशात परदेशात संपर्क, रत्नागिरीतील अवैध कॉल सेंटरचा पर्दाफाश, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Follow us on

रत्नागिरी : दहशदवाद विरोधी पथकासह रत्नागिरी पोलिसांनी कमी पैशात देशासह परदेशात संपर्कासाठी चालवले जाणाऱ्या अवैध कॉलिंग सेंटरचा पर्दाफाश केलाय. यासाठी इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिम’चा उपयोग केला जात होता. शुक्रवारी (13 ऑगस्ट) करण्यात आलेल्या या कारवाईत मास्टर माईंड असलेल्या फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी याच्यासह मोबाईल शॉपी मालकाला अटक केली आहे.

अशा प्रकारच्या हायस्पिड इंटरनेटद्वारे सिप ट्रंक सिस्टिमचा वापर दहशतवादी कृत्य करण्यासाठी सर्रास होत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. तसा संबंध रत्नागिरी शहरातील आठवडा बाजारात उघड झालेल्या अवैध कॉलिंग सेंटरशी आहे का? ते आता पोलीस तपासात स्पष्ट होणार आहेत. सध्या या दोघांविरोधात शासनाचा महसूल बुडवल्याप्रकारणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रत्नागिरी शहरातून हायस्पिड इंटरनेटद्वारे इंटरनॅशनल कॉल

कोकण किनारपट्टीवरील महत्वाचे शहर असलेल्या रत्नागिरी शहरातून हायस्पिड इंटरनेटद्वारे इंटरनॅशनल कॉल होत असल्याची माहिती मुंबई एटीएसला त्यांच्या यंत्रणेद्वारे मिळाली होती. अशा प्रकारच्या कॉल सिस्टीमचा वापर दहशतवादी कृत्यासाठी सर्रास होत असल्याने मुंबईचे एटीएस पथक अधिक अलर्ट झाले. त्यांनीही माहिती तात्काळ रत्नागिरी दहशदवाद विरोधी पथकाला कळविली आणि पोलिसांची सूत्रे तत्काळ हलली. ही यंत्रणा कुठे सुरू आहे हे लक्षात घेऊन रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील श्रीटेक मोबाईल दुकानात पोलिसांनी धाड टाकली. याच दुकानातून इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर चालविले जात होते.

मोबाईल दुकान मालक पोलिसांच्या ताब्यात, नवी मुंबई कनेक्शन उघड

श्रीटेक मोबाईल दुकानाचे मालक अलंकार अरविंद विचारे यांच्या दुकानात इंटरनॅशनल कॉलिंगचा सर्व्हर बसवण्यात आला होता. या सर्व्हरवरूनच इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. हे उघड झाल्यानंतर अलंकार विचारे यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गडबडलेल्या विचारे यांनी नंतर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार रत्नागिरीतील एका व्यक्तीने अलंकार विचारे यांची ओळख फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी (रा. पनवेल, नवी मुंबई) याच्यासोबत करुन दिली होती.

रत्नागिरीत सर्व्हर, थेट मुंबई येथील वांद्रेमधील इमारतीतून कॉलिंग सेंटर

तू फैजलला मदत कर, तुला त्याचा मोबदला देईल, असे सांगितल्यानंतर केवळ एकदाच फैजल रत्नागिरीत आला. त्यानंतर तो मोबाईलवरुनच अलंकार यांना सूचना किंवा संपर्क करत होता. त्याच्या सुचनेनुसार अलंकार याने आपल्या मोबाईल शॉपीमध्ये सर्व्हरसह इतर यंत्रणा बसवून घेतली होती. त्या बदल्यात काही मोबदला अलंकार याला देण्यात आला होता. यामध्ये अलंकार विचारे यांच्या नावे एका खासगी कंपनीचे हायस्पीड इंटरनेट कनेक्शन घेण्यात आले होते. त्यामार्फत रत्नागिरी येथे सर्व्हर बसवून त्या सर्व्हरवरुन कॉलिंग सेंटर थेट मुंबई येथील वांद्रेमधील एका इमारतीतून सुरू होते. वाईप अॅपद्वारे हे इंटरनॅशनल कॉलिंग सुरू होते. या साऱ्या प्रकरणाचा आढावा घेतला आहे.

फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी हाच मास्टर माईंड

या प्रकरणात सध्या तरी फैजल रज्जाक अली रज्जाक सिद्दीकी हाच मास्टर माईंड असल्याचे पुढे आले आहे. हा सिद्दीकी रत्नागिरीत येत असल्याची माहिती रत्नागिरी एटीएसला मिळाली होती. या माहितीवरुन साळवी स्टॉप येथे सापळा रचण्यात आला होता. पोलिसांनी फैसल याला मोठ्या शिताफीने साळवी स्टॉप येथे ताब्यात घेतले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अलंकार विचारे व फैसल सिद्दीकी या दोघांविरोधात शहर पोलीस स्थानकात भा.दं.वि.कलम 420, 34, आयटी अॅक्ट 43 (ह), 66 (ड), इंडियन टेलिग्राफीक अॅक्ट 4, 20, 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

“अशा प्रकारच्या कॉलिंग सिस्टीम वापर दहशतवादी कृत्यासाठी”

याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल लाड करत आहेत. दरम्यान सध्या या दोघांनी अवैध इंटरनॅशनल कॉलिंग सेंटर सुरू करून कमी पैशात देश आणि परदेशात कॉलिंगसाठी त्याचा वापर केला. देशाचा महसूल बुडवला तसेच माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. परंतु अशा प्रकारच्या कॉलिंग सिस्टीम वापर दहशतवादी कृत्यासाठी होत असल्याने या प्रकारांचे गांभीर्य वाढले आहे. याच सिस्टीमचा सर्व्हर रत्नागिरीत होते तर कॉलिंग सेंटर मुंबई येथे होते. त्यामुळे त्याचा वापर केवळ परदेशात बोलण्यासाठी झाला, की दहशदवाद कारवायांसाठी याचा वापर होत होता. याचा शोध शहर पोलीसांनी सुरु केला आहे.

हेही वाचा :

Cyber Crime | ऑनलाईन घोटाळ्यापासून स्वतःचा बचाव कसा कराल?

सायबर गुन्हेगार फोफावले, चक्क पोलिसाचे फेसबुक अकाऊण्ट हॅक, मेसेंजरद्वारे पैशांची मागणी

Cyber Crime | खतरा या खौफ, सायबर गुन्हेगारांना कसे ओळखावे?

व्हिडीओ पाहा :

ATS and Ratnagiri police action on High speed internet calling center