रायगडच्या (Raigad) हरिहरेश्वेर समुद्र किनाऱ्यावर गुरुवारी एक संशयित बोट आढळून आली होती. या बोटीमध्ये शस्त्रसाठा आढळून आला होता. या शस्त्रांमध्ये एके 47 चा (AK 47) समावेश होता. या वृत्ताने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या संशयित बोटीवरील बॉक्स ज्यामध्ये शस्त्रसाठा आढळून आला होता तो एटीएसकडून (ATS) जप्त करण्यात आला आहे. ही बोट नेमकी कोणत्या ठिकाणावरून आली? कशी आली याचा शोध घेण्यात येत आहे. या संशयास्पद बोटीच्या सर्व खातरजमा तपासण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच फॉरेन्सिक लॅबचं पथक देखील घटनास्थळी दाखल होणार आहे. दरम्यान दुसरीकडे हरिहरेश्वर किनाऱ्यावर अशी संशयास्पद बोट आढळून आल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. रायगड, पणे आणि मुंबईमधील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पोलिसांकडून वाहनांची तपासणी देखील सुरू होती.
हरिहरेश्वरमध्ये गुरुवारी एक संशयास्पद बोट आढळून आली होती. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल्स आणि जिवंत काडतुसं आढळून आले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. ऐन सणोत्सवाच्या काळात ही बोट आढळून आल्याने पोलीस सतर्क झाले. मुंबईसह पुणे आणि रायगडच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. दरम्यान हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर सापडलेली ही बोट ओमानची असल्याची माहिती समोर येत आहे. जूनमध्ये ओमानच्या समुद्र किनाऱ्यावरून काही बोटी भरकटल्या होत्या त्यातील एक बोट हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत नेपच्युन मेरिटाईम सिक्युरिटी या कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. या बोटीमध्ये तीन एके 47 रायफल्ससह जिवंत काडतूसे आढळून आली आहेत.
या संशयास्पद बोटप्रकरणात सध्यातरी कोणताही दहशतवादी अँगल समोर आला नसल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मात्र सध्या सणासुदीचा काळ असल्याने कोणतीही शक्यता नाकारतला येत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. आता या प्रकरणात संशयित बोटीवरील बॉक्स ज्यामध्ये शस्त्रसाठा आढळून आला होता तो एटीएसकडून जप्त करण्यात आला आहे. तसेच बोटीच्या अधिक तपासासाठी लवकरच फॉरेन्सिक लॅबचं पथक देखील घटनास्थळी दाखल होणार आहे.