चैतन्य गायकवाड, TV9 मराठी, नाशिक : थकीत रक्कम वसुलीसाठी गेलेल्या एका फायनान्स कंपनीच्या एजंटसह त्याच्या साथीदारावर ज्वलनशील पदार्थ टाकून हल्ला केल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली. नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीत ही घटना घडली. या घटनेत वसुलीसाठी आलेले दोघे जण जखमी झाले आहेत. गणेश बापूराव फापळे आणि किरण भास्कर फापळे हे दोघे जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी सुनील देशमुख याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
संशयित आरोपी सुनील देशमुख याने बजाज फायनान्स या कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र काही महिन्यांपासून त्याने कर्जाचे हफ्ते फेडले नव्हते. हफ्ते थकल्याने वसुलीसाठी गणेश फापळे यांनी सुनील देशमुखला फोन केला. देशमुखने त्यांना पैसे घेण्यासाठी अंबड औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीत बोलावले. त्याप्रमाणे गणेश फापळे आणि त्यांचे सहकारी किरण फापळे हे अंबड औद्योगिक वसाहतीत गेले.
कंपनीत जाताच गणेश फाफळे यांनी संशयित देशमुख याच्याकडे थकीत पैशाची मागणी केली. यावेळी देशमुख याने शिवीगाळ करत बाटलीमध्ये असलेला ज्वलनशील पदार्थ गणेश फापळे आणि त्यांचासोबत असलेले सहकारी किरण फाफळे यांच्या अंगावर टाकले. यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना पाथर्डी फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.