AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्येप्रकरणात त्याची पत्नी निकिता सिंघानिया हिच्यासह तीन जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 14 डिसेंबर रोजी त्यांना अठक करण्यात आली. प्रयागराज न्यायालयाने त्या तिघांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र या केसमध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. निकिता आणि अतुल यांच्याबाबत जौनपूर कौटुंबिक न्यायालयात खटल सुरू होता, त्यावेळी निकिता अतुलकडून 80 हजार रुपये मेंटेनन्स का मागत होती याचा खुलासा समोर आला आहे.
कोर्टात समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, अतुलचं असं म्हणणं होतं की तो निकिताला मेंटेनन्ससाठी 80 हजार रुपये देऊ शकत नाही , निकिता स्वत: चांगले पैसे कमावते, मग तिला मी दरमहिन्याला 80 हजार रुपये का द्यावे, असा अतुलचा सवाल होता. त्यावर निकीताने दिलेल्या उत्तराचा आता खुलासा झाला आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिने जौनपूरमध्ये 60 लाखांचा एक फ्लॅट विकत घेतला होता, त्यासाठी तिने कर्जही काढलं होतं. त्याचा हप्ता तिला दर महिन्याला भरावा लागतो. तिचा सर्व पगार त्यामध्येच जातो, त्यामुळेच तिला तिच्या महिन्याभराचा खर्च करणं कठीण होतं, असा निकीताचा दावा होता.
बिहारमधील समस्तीपूरचा असलेला पण बंगळुरूत राहणारा AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अतुल सुभाष याने 9 डिसेंबर रोजी आत्महत्या केली. हे प्रकरण खूप चर्चेत आलं. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी अतुलने 24 पानांची सुसाईड नोट लिहीली होती आणि 1 तासाचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. यामध्ये अतुलने आपल्या मृत्यूसाठी पाच जणांना जबाबदार धरले. आपली पत्नी, सासू, भावजय, चुलत सासरे आपल्याला पैशांसाठी सतत त्रास देत आहेत. माझ्यावर एकापाठोपाठ एक असे एकूण 9 खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोप त्याने केला होता.
पत्नीनेच सोडलं घर
आपली पत्नी स्वत:घर सोडून तिच्या आईवडिलांच्या घरी गेली. आमचा मुलगा व्योमलाही सोबत नेलं. साडेतीन वर्षांपासून मला माझ्या मुलाला पाहण्याची इच्छा आहे. मला त्याचा चेहरा बघण्याचीही परवानगी नाही. ना त्याच्याशी कधी बोलता येतं. माझा मुलगा कसा दिसतो हे मी विसरलोय, जुने फोटो पाहिले की मगच मला त्याचा चेहरा आठवतो. मुलाचा शस्त्र म्हणून वापर करत माझी पत्नी पैसे उकळते, असा आरोपही अतुलने त्याच्या नोटमध्ये काल होता. माझी सासू आणि मेव्हणा यांनी माझ्याकडून 16 लाख रुपये उधार घेतले होते आणि तरीही ते 50 लाख मागत होते. मी जेव्हा पैसे देण्यास नकार दिला, त्यांनी घाणेराडा खेळ खेळण्यास सुरूवात केली, असा आरोप अतुलने केला.
80 हजार मेंटेनन्सची मागणी
आत्महत्या करण्यापूर्वी अतुलने एक व्हिडीओ शूट करत त्याचं म्हणणं मांडलं. माझ्याकडेर एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मुलासाठी दरमहा 40 हजार रुपये मेंटेनन्सची मागणी केली. मी माझ्या मुलासाठी पैसे द्यायचो मेंटेनन्स द्यायचो. मात्र नंतर ही रक्कम 80 हजार रुपये करण्यात आली. माझा स्वतःचा पगार इतका नाही. मी एवढा पैसा कुठून आणणार ? एवढं करूनही त्यांचं मन भरलं नाही, तेव्हा त्यांनी माझ्याकडे 3 कोटी रुपये मागितले. एवढे पैसे देणारा तर आत्महत्या करेल, असं मी कोर्टात म्हटलं. त्यावर माझी पत्नी म्हणाली, मग तूही आत्महत्या कर ना..! त्यावर न्यायाधीशही पत्नीला काहीच बोलल्या नाहीत,उलट त्या हसू लागल्या. त्यांनी माझ्याकडेच 5 लाख रुपयांची मागणी केली, म्हणाल्या, पैसे दे मी केस सेटल करेन. पैशांसाठी न्या. रीटा कौशिकनेही मला खूप टॉर्चर केलं असे अनेक आरोप अतुलने आत्महत्येपूर्वी केले.
14 डिसेंबरला अटक
यानंतर अतुलने आत्महत्या केली. 10 डिसेंबर रोजी अतुलचा भाऊ विकास मोदीच्या तक्रारीवरून बेंगळुरू पोलिसांनी निकिता सिंघानिया, निशा, अनुराग आणि सुशील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर चार दिवसांनी पोलिसांना यश आले. 14 डिसेंबर रोजी त्यांनी निकीता हिला गुरुग्राममधून अटक केली तर अतुलची सासू आणि मेव्हणा यांना प्रयागराजमधून बेड्या ठोकल्या. तिघांनाही प्रयागराज न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणातील चौथ्या आरोपीचा म्हणजेच निकिताचा काका सुशील सिंघानिया याचा शोध सुरू आहे.