औरंगाबादः शेंदूर लावलेल्या दोन दगडांखाली मानवी सांगाडा आढळून आल्यानंतर औरंगाबादमध्ये (Aurangabad) खळबळ माजली होती. हा सांगाडा पुरुषाचा आहे की महिलेचा याचा तपास सुरु होता. अखेर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. हा नरबळीचा प्रकार नाही ना, असा संशय पोलिसांना (Police) येत होता. मात्र पत्नीच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्याने पतीने तिला अशा प्रकारे पुरून ठेवल्याचं उघड झालंय.
वाळूजच्या समता कॉलनी परिसरात सूर्यकांत गोरखनाथ शेळके यांचे दोन मजली घर आहे. तळमजल्यावरील दोन खोल्या काकासाहेब भूईगड यांना भाड्याने देण्यात आल्या होत्या.
भुईगड हे आपली पत्नी आणि दोन मुलींसह राहत होते. तीन महिन्यांपूर्वी नवरात्रीसाठी भुईगड येथे जात असल्याचे त्यांनी घरमालकाला सांगितले.
शेळके यांनी भाडे देण्यासाठी अनेकवेळा भुईगड यांना फोन लावला. ते गावाहून परत कधी येणार हेही विचारले. पण त्यांनी काहीच उत्तर दिले नव्हते.
तीन महिने घर बंदच असल्याचं परिसरातील नागरिकांनी सांगितलं अखेर शेळके यांनीच घरी येऊन कुलूप तोडले.
दार उघडताच चित्र पाहून सारे हादरले. स्वयंपाक घरात ओट्याखाली वाळू, बांधकाम केलेलं दिसलं. तेथे शेंदूर लावलेले दोन दगड आणि लिंबू-मिरची ठेवण्यात आले होते.
या प्रकरणाची पोलिसात तक्रार देण्यात आली. स्वयंपाक घरातल्या त्या जागेत मानवी सांगाडा आढळून आला.
ही घटना ऐकून औरंगाबादमध्ये खळबळ माजली होती. अखेर पोलिसांनी सदर प्रकरणाचा खुलासा केला.
आजारपणात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे पतीनेच सासूच्या मदतीने पत्नीचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला असल्याचे समोर आले आहे. वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून हा खुलासा केला.
मयत महिलेच्या पतीला ताब्यात घेतल्यानंतर पतीनेच ही कबुली दिली आहे…
काकासाहेब भुईगड असं पत्नीचा मृतदेह पुरणाऱ्या पतीचे नाव आहे, तर अनिता भुईगड असं या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्यामुळे मृतदेह स्वयंपाक घरात पुरावा लागण्याची दुर्दैवी वेळ या कुटुंबावर आली होती. त्यामुळे मृत्यूही आता महाग होत चालला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.