दिल्ली : राजधानी दिल्लीतील (Delhi Murder News) एका कुटुंबात आई वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केली. श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे लिव्ह इन रिलेशनशिप हा प्रकार चर्चेत आलेला असतानाचा दिल्लीत आणखी एक सनसनाटी हत्याकांड उघडकीस आलंय. यमुना एक्स्प्रेस वे जवळ 21 वर्षीय मुलीचा मृतदेह एका बॅगेत आढळून आला होता. त्यानंतर या खळबळजनक हत्याकांडाचा खुलासा झाला. हत्या करण्यात आलेल्या मुलीचं नाव आयुषी यादव (Ayushi Yadav) असं असल्याचं समोर आलंय. हे हत्याकांड ऑनर किलिंगचा (Honour Killing) प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र प्राथमिक माहितीनुसार या हत्याकांडाचा उलगडा करताना पोलिसांनी समोर आणलेले पैलू हादरवणारे आहेत.
आयुषी यादव ही 21 वर्षीय तरुणी 17 नोव्हेंबर रोजी घरी आली. तिनं आपल्या मर्जीनं लग्न केल्यानं तिचे पालक संतापले होते. 17 नोव्हेंबर रोजीच गोळ्या घालून आयुषीचे वडील नितेश यादव यांनी तिची हत्या केली होती. त्याआधी आयुषी आणि तिच्या वडिलांचं कडाक्याचं भांडण झालं होतं.
मुलीनं कुणाशी लग्न करायचं, यावरन बापलेकीमध्ये खटके उडाले होते. 17 नोव्हेंबर रोजी जेव्हा आयुषी लग्न करुनच घरी आली तेव्हा तिच्या वडिलांनी टोकाचं पाऊल उचललं आणि पोटच्या पोरीचीच हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे आयुषीच्या आईनेही या हत्याकांडात वडिलांना साथ दिल्याचंही समोर आलंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुषीच्या आईने तिची हत्या केली नसली, तर हत्येनंतर आयुषीच्या वडिलांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात मदत केल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. आयुषीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरुन तो यमुना एक्स्प्रेस वे इथं एका ठिकाणी बॅगेत टाकून देण्यात आला होता.
ही बॅग जेव्हा आढळली, तेव्हा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचं आणि हत्येचं कारण शोधण्यापर्यंत तपास करण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. अखेर या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलंय.
18 नोव्हेंबर रोजी रक्ताने माखलेल्या एका ट्रॉली बॅगेत आयुषीचा मृतदेह आढळून आलेला होता. हा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासणी केली. त्यानंतर आयुषीच्या घरचा पत्ता पोलिसांनी शोधून काढला. त्यावेळी तिचे वडील फरार असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं.
अखेरीस पोलिसांनी आयुषीची आई आणि भाऊ यांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटवली. आपली संपूर्ण यंत्रणा पणाला लावत आयुषीच्या वडिलांनाही पोलिसांनी शोधून काढलं. पोलिसांच्या चौकशीत वडिलांनीही आयुषीची हत्या केल्याची कबुली दिली.
घरातल्यांसमोरच वाद झाल्यानंतर वडिलांनी आयुषीला गोळ्या घातल्या होत्या. त्यानंतर तिच्या मृतदेह वडिलांनी आईच्या मदतीने ट्रॉली बॅगमध्ये भरला होता, असं समोर आलं आहे. गेले काही दिवस आयुषी घरातून बेपत्ता होती. पण कुणीही तिच्या बेपत्ता असण्याबद्दल तक्रार न दिल्यानं पोलिसांना हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं असल्याचा अंदाज आला होता.
सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडिया, सीडीआर या सगळ्याच्या मदतीने पोलिसांनी कसून तपास करत आता आरुषीची आई आणि वडील दोघांनाही अटक केली आहे. त्यांची सध्या अधिक कसून चौकशी केली जातेय. या हत्याकांडाने परिसरात आणि यादव कुटुंबात खळबळ माजलीय.
नितेश यादव हे कामानिमित्त दिल्लीतील एका गावात राहण्यासाठी आले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. पत्नी पत्नी आणि दोन मुलं असा हसता खेळता परिवार होता. मात्र मुलीनं आपल्या पसंतीच्या मुलाशी लग्न न करता स्वतःच्या मर्जीने जोडीदार निवडल्यानंतर नितेश यादव यांनी हे धक्कादायक कृत्य केलंय. यादव कुटुंब हे मूळचा उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील असल्याचंही पोलिसांच्या तपासातून समोर आलंय.