काही महिन्यांपू्र्वीच काँग्रेसमधून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेलेले नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली आहे. पण या हत्याकांडाबद्दल अजून असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत. बाबा सिद्दीकी यांना मारण्यामागचं कारण काय होतं ? दसऱ्याच्या दिवशीच त्यांची हत्या का करण्यात आली ? त्यापूर्वी हल्लेखोरांची रेकी अपयशी ठरली का ? बाबा सिद्दीकी यांना मारून अखेर कोणता मेसेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे ? असे अनेक प्रश्न समोर असून त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून त्यामध्ये एक महत्वाचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, मारेकऱ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लान थोडा वेगळा आखला होता, मात्र ऐन वेळेस तो प्लान बदलण्यात आला. तीन हल्लेखोरांनी हे हत्याकांड घडवलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी हत्येसाठी तीन शूटर आले होते. धर्मराज कश्यप, गुरमेल सिंग आणि शिवकुमार गौतम, अशी त्या तिघांची नावे असून शिवकुमार गौतम संपूर्ण टीमचे नेतृत्व करत होता. बाबा सिद्दीकी यांना मारण्याची योजना वेगळी होती, मात्र नंतर आजूबाजूची परिस्थिती पाहून तो प्लान बदलण्यात आला. आधीच्या प्लानप्रमाणे, गुरमेल आणि धर्मराज हे दोघे सिद्दीकी यांच्यालर गोळ्या झाडणार होते. मात्र घटनेच्या वेळी बाबा सिद्दीकी यांच्या आसपास असलेली लोकांची गर्दी तसेच पोलिसांची सुरक्षा व्यवस्था पाहून शिवकुमारने ऐनवेळी त्यांचा प्लान बदलला. नव्या प्लाननुसार, शिवकुमार याने स्वत:च बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडण्याची जबाबदारी स्वीकारली. ‘ नीट लक्ष देऊ ऐका, आता मी गोळ्या झाडेन. जर काही गडबड झालीच तर तुम्ही गोळीबार करा आणि फरार व्हा’ असे त्याने त्याच्या इतर साथीदारांना सांगितलं.
काय होता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्लान B ?
नव्या प्लाननुसार बाबा सिद्दिकींची हत्या करण्यात आली. आरोपी शिवकुमारने स्वतःच बाबा सिद्दीकी यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या. त्यातील 3 गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या. गोळी झाडल्यानंतरच शिवकुमार तेथून पळून गेला, आणि आजूबाजूला असलेल्या गर्दीमध्ये झटकन मिसळला. तर त्याचे साथीदार धर्मराज आणि गुरमेल हे दोघेही हातात पिस्तूल पकडून तिथून पळाले, पण थोड्याच अंतरावर पोलिसांनी त्या दोघांना पकडलं. धर्मराज आणि गुरमेल यांच्याकडे पिस्तूल होते, पण दोघांनीही गोळीबार केला नाही. तिन्ही शूटर्सकडे मिरची पावडरही होती, असे तपासात समोर आले आहे.
कोणी झाडली गोळी ?
पोलिसांच्या तपासानुसार, शिवकुमारने बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि त्यांच्या सुरक्षेसाठी उभ्या असलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. पोलिस हे धर्मराज आणि गुरमेल यांची कसून चौकशी करत आरहेत, पण बाबा सिद्दीकी यांना मारण्याचे आदेश कोणी दिले होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. बाबा सिद्दीकी यांना मारण्याचा आदेश कोणी दिला होता हे फक्त शिवकुमार गौतमलाच माहीत होतं. त्यामुळेच आता पोलीस हे शिवकुमार गौतमचा कसून शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याची कुंडली बाहेर काढत तपास सुरी केला आहे, मात्र तो अद्याप काही पोलिसांच्या हाथी लागलेला नाही.
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात समोर आलं यूपी, पंजाब कनेक्शन
दरम्यान या हत्याकांडप्रकरणी यूपी आणि हरियाणापाठोपाठ आता पंजाबचेही कनेक्शन समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी झिशान अख्तर हा पंजाबमधील जालंधरचा रहिवासी आहे. त्याचे खरे नाव मोहम्मद यासीन अख्तर आहे. सर्व आरोपी मुंबईत जिशानसोबत राहत होते आणि घटनेच्या वेळी जिशान तीन शूटर्सना सूचना देत होता, अशी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशाशीही जोडलेले असल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलीस मध्यप्रदेशात पोहोचले आहेत. मध्य प्रदेशातून एका आरोपीचे शेवटचे लोकेशन सापडले. ओंकारेश्वर, खांडवा, उज्जैन येथे आरोपींचा शोध सुरू आहे.