अजितदादा गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला चार दिवस होत आहे. आज चौथ्या दिवशी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर पोलिसांनी एक काळी पिशवी सापडली आहे. गेल्या चार दिवसांपासून एकाच ठिकाणी पडलेली ही पिशवी पोलिसांनी जप्त केली आहे. या पिशवीत महत्त्वाचे पुरावे सापडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आता तपासाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असून पोलिसांकडे आरोपींविरोधात भक्कम पुरावे जमा झाल्याचंही सांगितलं जात आहे.
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडी हत्यारेही पोलिसांनी जप्त केली आहेत. पोलिसांनी गोळीबाराच्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर एक काळी पिशवी जप्त केली आहे. गोळीबार केल्यानंतर या आरोपींनी ही काळी पिशवी फेकली होती. या पिशवीत एक पिस्तुल आणि काही कागदपत्रे सापडली आहे. ही पिस्तुल खुनासाठी वापरलेली असून शकते, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी बॅग आणि पिस्तूल जप्त केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
कशी झाली हत्या
बाबा सिद्दीकी यांची हत्या 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9च्या सुमारास करण्यात आली होती. वांद्रे पश्चिमेकडील आपल्या कार्यालयातून जात असताना तीन शूटर्सनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक गोळी छातीत लागल्याने बाबा सिद्दीकी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ लिलावतीत नेण्यात आले होते. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.
बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी या मारेकऱ्यांना अटक केली आहे. या मारेकऱ्यांची कसून चौकशी केली असता केवळ बाबा सिद्दीकीच नव्हे तर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीही आरोपीच्या निशाण्यावर असल्याचं उघड झालं आहे. त्याच दिवशी दोघांनाही मारण्याचा आरोपींचा प्लान होता. पण ऐनवेळी झिशान यांना फोन आल्याने ते ऑफिसमध्येच थांबले. त्यामुळे ते या हल्ल्यातून बचावले.
पोलिसांची कारवाई
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी लगेचच दोन आरोपींना अटक केली. नंतर आणखी एकाला अटक झाली तर आज चौथ्या रोपीलाही पकडण्यात आलं आहे. हरीशकुमार बालकराम (वय 23) असे त्याचे नाव असून तो इतर आरोपींसाह पुण्यात स्क्रॅप डीलर म्हणून काम करत होता. त्याने या हत्याकांडासाठी पैसे आणि इतर गोष्टी पुरवल्याचा पोलिसांना संशय आहे. हरीशकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील बहराईच येथील रहिवासी असल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
या हत्याकांडात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांचं नाव आलं आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशी एक पोस्ट व्हायरल झाली होती. शुभू लोणकर नावाच्या व्यक्तीने ही पोस्ट फेसबुकवर टाकली होती. सलमान खान आणि दाऊद इब्राहीमला जो मदत करेल त्याचा हिशेब केला जाईल, असं या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
बाबा सिद्दीकी यांनी दाऊदला मदत केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. तर दुसरीकडे बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या अत्यंत जवळचे होते. या पोस्टच्या शेवटी लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा हॅशटॅगही होता.