Baba Siddiqui murder : बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाल्याची अफवा कोणी पसरवली ? मुंबई पोलिसांकडून ती फाईल पुन्हा ओपन

| Updated on: Oct 17, 2024 | 11:45 AM

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिस चहूबाजूने तपास करत आहेत. याचदरम्यान एक महत्वाचा मुद्दाही समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची अफवा मे महिन्यात देखील उठली होती.

Baba Siddiqui murder : बाबा सिद्दीकींवर गोळीबार झाल्याची अफवा कोणी पसरवली ? मुंबई पोलिसांकडून ती फाईल पुन्हा ओपन
बाबा सिद्दीकी
Follow us on

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी भररस्त्यात गोळ्या घालून हत्या झाली आणि फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरला. एका मोठ्या राजकारण्याची भररस्त्यात एवढ्या सहजपणे झालेली हत्या पाहून खळबळ माजली असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अक्षरश: ऐरणीवर आल्याचं बोललं जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चौघांना अटक केली असून धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह हे दोघे मारेकरी तसेच त्यांची मदत करणारे प्रवीण लोणकर आणि हरीशकुमार अशी त्यांची नावे आहेत. मात्र गोळीबार करणार मुख्य आरोपी शिवकुमार, तसेच या हत्येची जबाबदारी घेणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणार शुमभ लोणकर आणि हत्याकांडाचा मास्टरमाईड झिशान हे अजूनही फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रात्रंदिवस तपास करत असून शुभम लोणकर हा परदेशात पळून जाण्याची भीती असल्याने त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे.

दरम्यान सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिस चहूबाजूने तपास करत आहेत. याचदरम्यान एक महत्वाचा मुद्दाही समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची अफवा मे महिन्यात देखील उठली होती. त्यावेळी ही अफवा कोणी पसरवली यासंबंधी पोलीस चौकशी करणार आहेत. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे अशी अफवा 21 मे रोजी सगळीकडे पसरली होती. त्यानंतर पोलिसांनी सिद्दीकी यांच्याशी संपर्क साला होता. बाबा सिद्दीकी यांच्याशी त्यावेळी पोलिसांच बोलण झाल्यानंतर ते लंडनमध्ये असल्याच समोर आलं होतं. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

मात्र त्यानंतर 5 महिन्यांनी, 12 ऑक्टोबर रोजी सिद्दीकी यांच्यावर खरोखर गोळीबार झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मे महिन्यात पसरलेल्या त्या अफवेचं आणि या हत्येचं खरोखर काही कनेक्शन आहे का याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या अफवेच्या अनुषंगाने तेव्हा असा कुठला गोळीबाराचा प्रयत्न झाला होता का हेही पोलिसांनी तपासले मात्र तसे काहीही आढळून आले नाही.

व्हीआयपीना सुरक्षा पुरवणाऱ्या विभागाची बैठक

दरम्यान बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर व्हीआयपीना सुरक्षा पुरवणाऱ्या विभागाची बैठक बोलावण्यात आली होती. नेते तसेच व्हीआयपी त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांना स्वतःच्या गाडीत बसू देत नाहीत अशी तक्रार करण्यात आली होती. व्हीआयपीना सुरक्षा पुरवणाऱ्या सर्व पीएसओची बैठक घेण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ज्या खबरदाऱ्या घ्यायला हव्यात त्याचं व्हीआयपीकडूनच उल्लंघन होत असल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.

नियमानुसार सुरक्षारक्षक पूर्णवेळ व्हीआयपीच्या सोबत असणे आवश्यक आहे मात्र काही व्हीआयपी स्वतःच्या गाडीत सुरक्षारक्षकाला बसू ना देता दुसऱ्या गाडीत बसायला सांगतात अशी पोलिसांची तक्रार आहे. गाडीत बसल्यावर काही गोपनीय कॉल पोलीस कर्मचाऱ्याने ऐकू नयेत म्हणून असे केले जात असल्याची तक्रारीत नमूद करण्यात आले. अचानक कुठेही व्हिजिट करणे, अचानक रूट चेंज करणे या पद्धती चिंताजनक असल्याचीही तक्रार पोलिसांनी केली.